Ahmednagar Politics : लोकसभा निवडणूकीत ज्यांना भाजपाचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांना स्वतःच्या गावात मताधिक्य देता आले नाही त्या भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांची खासदार नीलेश लंके यांच्यावर टीका करण्याची लायकी नसल्याचे प्रत्युत्तर त्यांच्याच गावातील लंके समर्थकांनी दिले आहे.
राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सुुहासराव कासार, पंचायत समितीचे मा. सदस्य संभाजीराव कासार, उपसरपंच दादासाहेब कासार, सामाजिक कार्यकर्ते गुंडा भाऊ जासूद, अरूण कासार, ग्रामपंचायत सदस्य विकास कासार, सागर कासार, संदीप बोठे, डॉ. राजू बोठे, बंटी शेख, शिवसेना नेते अप्पा भालसिंग, संजय भालसिंग यांनी भालसिंग यांच्यावर हल्लाबोल करीत त्यांना चांगलेच सुनावले आहे.
प्रसिध्दीस देण्यात आलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, भाजपा जिल्हाध्यक्षांचा पायगुण असा आहे की, त्यांच्या विद्यामान खासदारांना लोकसभा निवडणूकीत पराभव पत्करावा लागला. पक्षाचे जिल्हाध्यक्ष असूनही त्यांना त्यांच्या वाळकी गावातूनच विखे यांना मताधिक्य देता आले नाही.
भालसिंग साहेब आगोदर तुम्ही ग्रामपंचायत निवडणूक लढवा, ग्रामपंचायत सदस्य व्हा व मगच अशी मुक्तफळे उधळा. खासदारांवर बोलण्याची आपली लायकी नाही. आपली क्षमता काय ? आपण बोलता काय ? असे प्रश्न या निवेदनात उपस्थित करण्यात आले आहेत.
निवडणूकीच्या काळातही तुम्ही अनेकदा टीका केली आम्ही त्याकडे दुर्लक्ष केले. याचा अर्थ आम्ही काही बांगडया भरलेल्या नाहीत हे लक्षात ठेवा अशी जाणीवही निवेदनात करून देण्यात आली आहे. निवेदनात पुढे नमुद करण्यात आले आहे की, अमूलच्या माध्यमातून जसा तुम्ही गुजरातचा उदो उदो करत आहात त्याच गुजरातप्रमाणे महाराष्ट्रात दुधाला भाव का नाही याचेही उत्तर देण्याची जबाबदारी तुमची असताना तुम्ही तुम्ही पराभूत झालेल्या विखे पाटलांची तळी उचलायला निघालात हे हास्यास्पद आहे.
स्वयंघोषीत कोण आणि लोकनेता कोण हे नगर दक्षिण मतदारसंघातील मतदारांनी महिन्यापूर्वीच मतपेटीतून दाखवून दिले आहे. शेतकऱ्यांच्या दुधाला, कांद्याला भाव मिळत नसेल तर त्याविरोधात आवाज उठविणे हे लोकपतिनिधीचे कर्तव्य असते. मात्र तुम्ही कधी कधी लोकप्रतिनिधी म्हणून जनतेच्या सुखः दुःखात सहभागीच झाला नाहीत तेंव्हा तुम्हाला वेदना कशा कळणार ?
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तुमच्या तत्कालीन खासदाराने किती आंदोलने केली ? संसदेत किती वेळा आवाज उठविला ? याचा अभ्यास भालसिंग यांनी करावा. खासदार लंके यांनी आंदोलन करून सरकारच्या नाकी नउ आणल्यामुळे पायाखालची वाळू सरकलेले भालसिंग बरळू लागले आहेत. गुजरातमधील अमूल हा ब्रँड कोणी विकसीत केला याची माहीतीही नसलेल्या भालसिंग यांनी विखे यांची मर्जी सांभाळण्यासाठी अशी नौटंकी करू नये असा सल्लाही या निवेदनात देण्यात आला आहे.