Ahmednagar News : खासदार नीलेश लंके यांच्या नेतृत्त्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनआक्रोश आंदोलन सुरू होते. आंदोलकांनी पालकमंत्री तथा दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे – पाटील यांनी हमीभावाचे आश्वासन द्यावे, अशी मागणी केली होती.
यासंदर्भात मंत्री विखे पाटील यांनी नीलेश लंके यांना भेटण्याची आपली तयारी असल्याचे म्हटले होते. दरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मध्यस्थीने व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेल्या काही आश्वासनानंतर हे आंदोलन स्थगित केले गेले आहे.

तीन दिवसांपासून सुरु असणाऱ्या आंदोलनस्थळी रविवारी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हजेरी लावली.
यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करत प्रश्न सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले व मंत्र्यांना लंके यांनी वेळ द्यावा असे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले. त्यांत आंदोलन मागे घेण्यात आले.
लंकेंच्या मागणीशी सहमत : मंत्री विखे
दुधाच्या दरासंदर्भात मी सभागृहात निवेदन केले असून आता त्यासाठी पुन्हा मी बाहेर निवेदन करणे योग्य ठरणारे नाही. असे असले तरी या संदर्भात सभागृहात काही फेरविचार करण्याबाबत विचार करू असे ते म्हणाले.
तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, की याबाबाबत जे काही निर्णय आहेत ते एका दिवसात घेता येणार नाहीत. खासगी दूध संघाने संकलन बंद केल्यास अनेक अडचणी येऊ शकतात.
आंदोलनकर्त्यांच्या मागणीशी सरकार सहमत असून मागण्या पूर्ण करण्यासाठी थोडावेळ लागणार आहे व तितका वेळ खासदारांनी दिला पाहिजे अशी विनंती विखे पाटील यांनी यावेळी आंदोलनकर्त्यांना केली.
खा. लंके काय म्हणाले..
खा. निलेश लंके यावेळी बोलतांना म्हणाले की, मंत्री महोदयांनी आंदोलनकर्त्यांकडे वेळ मागितली असून यात येणाऱ्या तांत्रिक अडचणी आम्हाला समजतायेत. अधिवेशन सुरू असल्याने तुम्हाला पण थेट आज काही घोषणा करता येणार नाही हे आम्ही समजू शकतो.
तसेच अनुदान देण्यापेक्षा दुधालाच भाव वाढून दिला पाहिजे व दूध भेसळ रोखली पाहिजे असेही लंके म्हणाले. दरम्यान त्यांनी विखे पाटील यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलन थांबवले.