Ahmednagar Politics : अनेक लोकोपयोगी निर्णयांतून सर्वसामान्यांना विकास साधण्याचे काम शासनामार्फत करण्यात येत आहे. विविध कल्याणकारी योजना गतीने व प्रभावीपणे राबवून जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यात येत आहे.
तिर्थक्षेत्र पर्यटन आणि औद्यगिक विकासातून रोजगार निर्मिती हाच प्राधान्यक्रम आहे. जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासाच्या संकल्पात सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसुल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री श्री विखे पाटील यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी जनतेला उद्देशुन शुभेच्छा संदेश देताना ते बोलत होते.यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ,
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, स्वातंत्र्य दिनाचा आनंदोत्सव अधिक द्विगुणीत होण्यासाठी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावर्षीही ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्याचे देशवासियांना आवाहन केले होते.
जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकवून देशाप्रती व्यक्त केलेला अभिमान आणि भारत मातेच्या प्रती दाखवलेली कृतज्ञता ही अखंड व बलशाली भारताच्या एकजुटीचे प्रतिक ठरले आहे.
या उपक्रमाने प्रत्येक शहर, गाव, वाडी-वस्ती तिरंगामय झाल्याचा मनस्वी आनंद होत आहे. स्वातंत्र्यानंतर या देशाच्या प्रगतीची वाटचाल अनेक टप्पे पुर्ण करुन यशस्वी होतांना दिसत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देशाचे नाव पूर्ण विश्वामध्ये घेतले जात असल्याचेही ते म्हणाले.
जनहिताचे अनेक निर्णय घेत शासनाची वाटचाल सुरु असल्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले की १ते १५ ऑगस्ट दरम्यान महसुल विभगामार्फत महसुल पंधरवडा राबविण्यात आला. या माध्यमातुन शेतकरी, सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी, स्वातंत्र्य सैनिक, दिव्यांगांचे प्रश्न सोडविण्याचा यशस्वी प्रयत्न करण्यात आला. या काळात जिल्ह्यात एकुण 33 हजार ३५३ शेतकऱ्यांनी ई-पीक पहाणीमध्ये सहभाग नोंदविला.
शेतरस्ते, शिवार रस्ते, पाणंद रस्त्याचे प्रश्न सोडवुन रस्ते समन्वयाने खुले करण्यात आले. युवासंवाद कार्यक्रमातुन ८ हजार ८३० दाखल्याचे युवकांना वाटप करण्यात आले. जिल्ह्यातील सैनिकांना 260 दाखल्यांचे वाटप करत नवनियुक्त 189 तलाठ्यांना नियुक्ती पत्राचेही वितरण करण्यात आल्याचे पालकमंत्री श्री विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.
राज्यात पहिल्यांदाच १ ते १५ ऑगस्ट दरम्यान पशसंवर्धन पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले होते. पशुसंवर्धन विभागाच्या योजना तसेच पशुधनासाठी आवश्यक असलेल्या आरोग्याच्या सुविधा थेट पशुपालकांच्या गोठ्यापर्यंत यामाध्यमातुन पुरविण्यात आल्या. पशुसंवर्धन पंचसुत्रीचा प्रचार, प्रसार या निमित्ताने करण्यात आल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.
जिल्ह्यातील १ लाख ७३ हजार ९९७ पशुपालकांना ९६ कोटी १९ लाख रुपयांचे दुध अनुदान त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले असल्याचेही ते म्हणाले. महाराष्ट्र शासनाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू केली आहे.
२१ ते ६५ वयोगटातील महिलांना शासनाकडून दरमहा १ हजार ५०० रुपयांची रक्कम बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार असुन या योजनेमध्ये जिल्ह्यातील ६ लक्ष ९१ हजार ३२९ महिलांचे अर्ज पात्र ठरले आहेत. तसेच राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी शासनाने “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना” सुरु केली आहे.
या योजनेंतर्गत युवकांना ६ हजार, ८ हजार व १० रुपयांचे मानधनही शासनाकडून देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील १ हजार ८ युवक या योजनेमध्ये सहभागी झाले असल्याचेही पालकमंत्री श्री. विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.
जिल्ह्यातील खंडकरी शेतकऱ्यांना त्यांच्या जमीनी भोगवटा वर्ग १ करुन विनामूल्य करुन देण्याचा शासनाने निर्णय घेतला असुन आकारी पडीत जमीनींच्या प्रश्नाबाबतही शेतकऱ्यांच्या बाजुने सकारात्मक निर्णय झाल्याने या जमीनी त्यांना देण्याचा मार्ग मोकळा झाल्याकडे पालकमंत्री श्री विखे पाटील यांनी लक्ष वेधले.
यावेळी पालकमंत्री श्री विखे पाटील यांनी उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, पदाधिकारी,
अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छाही दिल्या.यावेळी उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे, सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील, पोलीस उपनिरीक्षक पल्लवी वाघ, समाधान फडोळ, मनोज अहिरे, मनोहर खिदळकर, विलास जाधव यांचा सन्मान करण्यात आला. युद्धात अपंगत्व आलेल्या सैनिकांना ताम्रपटाचेही वितरण यावेळी करण्यात आले. यामध्ये नायब सुभेदार सुरेश आढाव, शिपाई बाळासाहेब डोंगरे, नायक किरण चौधरी, गनर कृष्णा हांडे यांचा समावेश होता.
प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेंतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, राहुरीचे तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे यांचाही पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. विशेष उल्लेखनीय सेवा पुरस्काराकरिता निवड करण्यात आलेले सावरगावतळ ता. संगमनेर येथील पोलीस पाटील गोरक्ष नेहे यांचा तर आदर्श तलाठी म्हणून राहाता येथील तलाठी श्रीकृष्ण शिरोळे यांचाही पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
राज्य गुणवत्ता यादीत आलेल्या शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांमध्ये शौर्य हजारे, कृष्णा चन्ना,, श्रावण ढोरमले, तनिष्का चौरे व आयुष मोरे या विद्यार्थ्यांचाही पालकमंत्री श्री विखे पाटील यांनी गौरव केला.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नायब तहसिलदार संध्या दळवी यांनी केले.कार्यक्रमास पदाधिकारी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, पत्रकार यांच्यासह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.