पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरासाठी महत्त्वाच्या रिंग रोड प्रकल्पाचे काम कधीपासून सुरू होणार ? समोर आली मोठी अपडेट

अर्थातच पुणे रिंग रोड प्रकल्पाच्या कामाचा श्रीगणेशा हा ऑक्टोबर महिन्यापासून होऊ शकतो. नक्कीच या प्रकल्पाचे काम लवकर सुरू झाले तर हा प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण होईल आणि यामुळे पुणेकरांना भविष्यात दिलासा मिळणार आहे.

Tejas B Shelar
Published:
Pune Ring Road

Pune Ring Road : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी रिंग रोड प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून शहराबाहेरून वाहतूक वळवण्यासाठी हा बाह्य रिंग रोड प्रस्तावित करण्यात आला आहे. हा एकूण 172 किलोमीटर लांबीचा आणि 110 मीटर रुंदीचा रस्ता आहे. या प्रकल्पाचे काम पूर्व आणि पश्चिम अशा दोन भागात विभागले गेले आहे.

या महत्वाकांशी महामार्ग प्रकल्पाचे काम एकूण नऊ पॅकेज मध्ये करण्याचा निर्णय राज्य रस्ते विकास महामंडळाने घेतला आहे. या नऊ पॅकेजच्या कामासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाने निविदा मागवल्या होत्या.

यासाठी सादर करण्यात आलेल्या 12 कंपन्यांच्या निविदांची छाननी महामंडळाच्या माध्यमातून करण्यात आली. मात्र यामध्ये कंपन्यांनी अधिकच्या दरात निविदा सादर केल्याचे उघडकीस आले.

त्यामुळे महामंडळाने त्रयस्थ कंपनीच्या माध्यमातून या निविदांच्या किमतीबाबत छाननी करण्याचा निर्णय घेतला. यासाठी दोन कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली. दरम्यान या संबंधित कंपन्यांनी निविदांची छाननी पूर्ण करून आपला अहवाल महामंडळाकडे नुकताच सुपूर्द केला आहे.

या अहवालात कंपन्यांनी जादा दराने निविदा दिल्याचे निष्पन्न झाले आहे. पण, त्या निविदा कमी-जास्त प्रमाणात करून म्हणजेच वाटाघाटी करून त्यांना काम देता येऊ शकते, अशी शिफारस केल्याचे महामंडळाच्या अधिकार्‍यांनी सांगितले आहे.

आता याबाबतचा एक अंतिम प्रस्ताव महामंडळाने राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. त्यामुळे राज्य शासनाने या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर आता या प्रकल्पाचे प्रत्यक्षात काम सुरू होऊ शकणार आहे.

रस्त्यांचे प्रत्यक्षात काम सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या परवानगीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे रस्ते विकास महामंडळाने पाठविला आहे. जर या प्रस्तावावर राज्य सरकारने लवकरात लवकर निर्णय घेतला तर या प्रकल्पाचे काम येत्या ऑक्टोबर पासून सुरू होऊ शकते असा दावा काही मीडिया रिपोर्टमध्ये केला जात आहे.

अर्थातच पुणे रिंग रोड प्रकल्पाच्या कामाचा श्रीगणेशा हा ऑक्टोबर महिन्यापासून होऊ शकतो. नक्कीच या प्रकल्पाचे काम लवकर सुरू झाले तर हा प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण होईल आणि यामुळे पुणेकरांना भविष्यात दिलासा मिळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe