भरधाव वेगातील कंटेनरने चार वाहनांना चिरडले; पांढरी पुलाजवळील घटना, एक ठार, सहा जखमी

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : अहमदनगर -छत्रपती संभाजीनगर या महामार्गावरील इमामपूर घाट, पंढरीपूल या भागात मोठ्या प्रमाणात अपघात होत असतात. त्यामुळे या अपघातात अनेक नागरिकांचा बळी देखील जात आहेत.

त्यामुळे या ठिकाणी अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची अनेकदा मागणी केली मात्र त्याकडे दुर्लक्ष केरण्यात आले. त्यामुळे याच ठिकाणी शनिवारी दुपारी भीषण अपघात झाला. यात कंटेनरने चार वाहनांना चिरडले आहे.

नगरहून छत्रपती संभाजीनगरकडे भरधाव वेगात जाणाऱ्या कंटेनरचे पांढरी पुलाजवळील इमामपूर घाटात ब्रेक फेल झाल्याने रस्त्यावर खड्डे बुजविण्याचे काम करणाऱ्या कामगाराला कंटेनरने चिरडले.

त्यानंतर २ मोटारसायकल, १ टेम्पो व १ हार्वेस्टर अशा चार वाहनांना धडक दिली. यात एकाचा मृत्यू तर ६ जण जखमी झाले आहेत. शनिवारी (दि.७) दुपारी १२.३० च्या सुमारास ही घटना घडली. रामदास पवार (वय ३५, रा. नाशिक) असे या अपघातात मयत झालेल्या कामगाराचे नाव असून, जखमींची नावे समजू शकली नाहीत.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, एक मालवाहू कंटेनर नगरहून छत्रपती संभाजीनगरकडे भरधाव वेगात जात होता. पांढरी पुलाजवळील इमामपूर घाटात उतरताना या कंटेनरचे अचानक ब्रेक फेल झाले. त्यामुळे चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटले आणि तो समोर चाललेल्या वाहनांना पाठीमागून धडक देत निघाला.

सुरुवातीला त्याने महामार्गावर खड्डे बुजविण्याचे काम करणारे कामगार रामदास पवार यांना चिरडले. त्यानंतर पुढे चाललेल्या २ मोटारसायकलींना धडक दिली. पुढे एका टेम्पोला धडक दिली.

या धडकेने टेम्पो रस्त्यावर उलटला. पुढे जावून कंटेनरने एका हार्वेस्टरला धडक दिली. तो हार्वेस्टर रस्त्याच्या बाजूला उडून पडला. या अपघातात खड्डे बुजविण्याचे काम करणारा कामगार रामदास पवार हा जागीच ठार झाला तर धडक बसलेल्या ४ वाहनांतील ६ जण जखमी झाले.

४ वाहनांना धडक दिल्यानंतर कंटेनर पांढरी पुलाजवळ जावून थांबला. त्यानंतर कंटेनर चालकाने कंटेनर तेथेच सोडून धूम ठोकली. दरम्यान जखमींना परिसरातील नागरिकांनी उपचारासाठी रुग्णवाहिका बोलावून नगरला हलविले.

या अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी आणि महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघात ग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला काढत वाहतूक सुरळीत केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe