१ जानेवारी २०२५ राहाता : शहर व ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून सकाळी दाट धुक्याची चादर पसरत असल्याने वाहनचालक, पादचारी आणि शेतकरी त्रस्त झाले आहेत, दाट धुक्यामुळे दृश्यमानता घटल्याने वाहन धारकांना प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.सकाळी आठ वाजेपर्यंत वाहन चालकांना हेडलाइट, इंडिकेटर व पार्किंग लाइट सुरू ठेवूनच गाड्या चालवाव्या लागत आहेत.
नगर ते सावळीविहीर राष्ट्रीय महामार्गासह सर्वच रस्त्यांवर धुक्याची स्थिती गंभीर आहे.रस्त्यावर काही फुटांवरच समोरील वाहन,पादचारी किंवा वस्तू दिसत असल्याने अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.धुक्यामुळे अनेक वाहनचालक सकाळच्या वेळी वाहन चालवणे टाळत आहेत.
धुक्याचा शेतकऱ्यांच्या पिकांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.हरभरा, गहू यासारख्या पिकांच्या उत्पादनावर धुक्यामुळे परिणाम होण्याची चिंता शेतकऱ्यांमध्ये दिसून येत आहे.सकाळच्या दवाने पिकांचे नुकसान होण्याची भीती वाढली आहे.
दरम्यान,शेतकरी सकाळच्या कामासाठी घराबाहेर पडताना त्रास सहन करत आहेत.दूध विक्री, चारा आणणे, भाजीपाला खरेदी-विक्री यासारख्या दैनंदिन कामांसाठी प्रवास करताना शेतकऱ्यांना धोक्याचा सामना करावा लागत आहे.
धुक्यामुळे पादचारी व दुचाकीस्वार देखील त्रस्त आहेत मॉर्निंग वाकला जाणारे नागरिक धुक्यातून जपून चालत आहेत, कारण दृश्यमानता अत्यंत कमी झाल्याने त्यांनाही समोरील दृश्याचा अंदाज येत नाही.विद्यार्थ्यांनी आणि लहान मुलांनी मात्र या धुक्याचा आनंद लुटल्याचे दिसून येत आहे.
दाट धुक्यामुळे वाहनांची गती मंदावली असून, रस्त्यावरील वाहतूक अडखळली आहे.खासकरून सकाळच्या वेळेस दाट धुक्यामुळे वाहनधारकांना हळूहळू व अधिक सावधगिरीने वाहन चालवावे लागत आहे.