१ जानेवारी २०२५ शिर्डी : सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी साईबाबांच्या दर्शनाला शिर्डीत दरवर्षी नाताळपासूनचं अनेक मंत्री, अभिनेते, सेलिब्रेटी, खेळाडू, उद्योगपती, आमदार, खासदार आदी बड्या मंडळीं हजेरी लावतात.
मंगळवारी देशाचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी साई समाधीचे दर्शन घेतले, तर केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दरवर्षीप्रमाणे साईबाबांच्या दर्शनाला हजेरी लावली. सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी देशभरातून लाखो साईभक्त शिर्डी नगरीत दाखल झाले आहेत.
तीन दिवसांत पावणेदोन लाख भाविकांनी साई संस्थानच्या प्रसादालयात महाप्रसादाचा लाभ घेतला तर सुमारे तीन लाख भाविक साईचरणी नतमस्तक झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तीर्थक्षेत्र असणाऱ्या साईबाबांच्या शिर्डी नगरीत नव वर्षाचे स्वागत करण्याकरिता तर सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी जगभरातून लाखो भाविक हजेरी लावत असतात.
२०२४ ला निरोप देण्यासाठी व २०२५ च्या स्वागतासाठी रविवार पासून शिर्डीत भाविकांच्या गर्दीचा ओघ दिसून आला.या पार्श्वभूमीवर साईबाबा संस्थान, पोलीस प्रशासन, शिर्डी नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने भाविकांची गैरसोय होऊ नये,म्हणून यंत्रणा तत्पर ठेवण्यात आली.
सोमवार आणि मंगळवार अहिल्यानगर ते सावळीविहीर दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या लांबवर रांगा लागल्या होत्या.साईबाबा संस्थानच्या रूमसह शहरातील हॉटेल, लॉजिंग हाऊसफुल्ल झाल्याचे दिसून आले.शहरातील सर्व रस्ते गर्दीने फुलून गेले होते.
सर्वत्र पालख्या, पद यात्रींचा साई नामाचा जयघोष सुरू होता.संस्थानच्या वतीने ठिकठिकाणी पालख्यांचे स्वागत करण्यात आले.शिर्डी महोत्सवानिमित्त बेंगलोर येथील साईभक्त बी.ए. बसवराज यांच्या देणगीतुन मंदिर व परिसरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली.
काल ३१ डिसेंबर रोजी मंगळवारी साई मंदिर भाविकांना दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवण्यात आले होते.दरवर्षी प्रमाणे रात्री १२ वाजता साई मंदिर परिसरात हजारोंच्या संख्येने भाविकांनी उपस्थिती लावून नवीन वर्षाचे स्वागत केले.
यावेळी आकाशात फटाक्यांची आतिषबाजी बघायला मिळाली.भाविकांनी साईबाबांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत बाबांकडे हे वर्षही सुखाचे समाधानाचे व आरोग्यदायी जावो, अशी प्रार्थना केली. शहरात ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.