७ जानेवारी २०२५ नवी मुंबई : पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार विजय चव्हाण यांची हत्या, त्यांची पत्नी, तिचा मामेभाऊ व प्रियकर यांनी कट रचून घडवून आणल्याचे तपासात निष्पन्न झाले.त्यानुसार, वाशी रेल्वे पोलिसांनी या हत्या प्रकरणात विजय चव्हाण याची पत्नी पूजा चव्हाण (३५), तिचा प्रियकर भूषण ब्राम्हणे (२९), मामेभाऊ प्रकाश ऊर्फ धीरज चव्हाण (२३) व त्यांचा साथीदार प्रवीण पाटील (२१) या चौघांविरोधात गुन्हा नोंद करून त्यांना अटक केली आहे.
यातील प्रकाश चव्हाण याने थर्टी फर्स्टच्या रात्री विजय चव्हाण यांना दारू पाजल्यानंतर ठरल्याप्रमाणे गाडीमध्ये तिघांनी त्यांची गळा दाबून हत्या केली.त्यांनतर त्यांचा मृत्यू रेल्वे अपघातामध्ये झाल्याचे भासवण्यासाठी धावत्या लोकलसमोर ढकलून दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा हिचे भूषण याच्यासोबत विवाहबाह्य संबंध होते.यात विजय चव्हाण अडथळा ठरत असल्याने तिने आपल्या पतीचा काटा काढण्याचा निर्णय घेतला.यासाठी तिने काही दिवसांपूवी भूषण व मामेभाऊ प्रकाश यांची भेट घेऊन पतीच्या हत्येची योजना आखली होती.
त्यानुसार,प्रकाशने ३१ डिसेंबर रोजी सकाळी विजय चव्हाण यांना फोन करून थर्टी फर्स्टच्या पार्टीचा बेत आखल्याचे सांगितले.त्यानुसार,सायंकाळी विजय चव्हाण आणि प्रकाश दोघे दारू प्यायले.त्यानंतर त्यांनी बाजूलाच असलेल्या हातगाडीवर बुर्जी घेऊन गाडीत बसल्यानंतर ठरल्याप्रमाणे गाडीमध्ये आधीपासून हजर असलेला भूषण व त्याचा मित्र प्रवीण या दोघांनी चव्हाण यांची गळा आवळून हत्या केली.
त्यानंतर त्यांनी चव्हाण यांचा मृतदेह मध्यरात्रीच्या सुमारास ट्रान्स हार्बर मार्गावरील रबाळे आणि घणसोली या रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे रुळालगत झुडपात नेला व ठाण्याहून पनवेलच्या दिशेने जाणारी पहिली लोकल येत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी विजय चव्हाण यांना धावत्या लोकलसमोर ढकलून दिले होते. हा प्रकार मोटरमनच्या लक्षात येताच त्यांनी काही अंतरावर लोकल थांबवली.त्यानंतर त्यांनी या प्रकाराची माहिती रेल्वेच्या नियंत्रण कक्षाला दिली होती.
त्यावर रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन विजय चव्हाण यांचा मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर ते पोलीस हवालदार असल्याचे व ते पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यात कार्यरत असल्याचे समजले.त्यांच्या शवविच्छेदनात त्यांची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचे उघडकीस आल्यानंतर वाशी रेल्वे पोलिसांनी वेगवेगळी तपास पथके तयार करून गुन्ह्याच्या तांत्रिक तपास केला असता चव्हाण यांची पत्नी व तिच्या प्रियकराने तसेच तिच्या मामेभावाने कट रचून विजय चव्हाण यांची हत्या घडवून आणल्याचे निष्पन्न झाले.या चौघांनी आपला गुन्हा कबूल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.