८ जानेवारी २०२५ मुंबई : मुंबईत ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस (एचएमपीव्ही) चे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. गेल्या आठवड्यात हिरानंदानी रुग्णालयात एका मुलीमध्ये विषाणूचे निदान झाले होते. रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ६ महिन्यांच्या मुलीला खोकला, श्वास घेण्यास त्रास आणि ताप आल्याने हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.या मुलीला १ जानेवारी रोजी दाखल करण्यात आले आणि गेल्या रविवारी तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
चीनमध्ये विषाणूजन्य पसरलेल्या ‘एचएमपीव्ही आजाराचे दोन संयशिय रुग्ण नागपुरात आढळून आल्याची माहिती मंगळवारी (ता.७) नागपुरात समाज माध्यमांवर पसरली.यात सात वर्षांचा मुलगा व १४ वर्षांची मुलगी असल्याची माहिती समोर आली आहे.यासंदर्भात नागरिकांमध्ये चुकीची माहिती जाऊ नये याकरिता जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी तातडीची पत्रकार परिषद घेऊन नागपुरात आढळलेले दोन्ही संशयित रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले असल्याचे सांगितले.
तसेच केवळ ऐकीव माहितीवर जर कोणी सोशल मीडियाद्वारे चुकीची माहिती पसरविल्यास त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी दिले.नागपुरात आढळलेल्या दोन संशयित रुग्णांच्या रक्ताचे नमुने पुढील तपासणीकरिता एम्स व पुणे येथे पाठविण्यात आले आहेत.
‘एचएमपीव्ही’ विषाणूबाबत सद्यःस्थितीत कोणतेही काळजीचे व घाबरण्याचे कारण नाही. याबाबत विनाकारण भीती पसरविणारे वृत्त कोणीही पसरवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले. नागपूर येथे दोन संशयित रुग्णांसंदर्भात समाजमाध्यमांवर सुरू असलेल्या शंकांना जिल्हाधिकारी यांनी सद्यःस्थिती समोर ठेवून पूर्णविराम दिला.
कोणत्याही साथीच्या आजाराबाबत शासकीय यंत्रणेवर पूर्ण विश्वास ठेवून व्यक्त व्हायला हवे.जे संशयित होते, ते स्वतः दवाखान्यात चालत आले.बरे झाल्यानंतर त्यांना घरी पाठविण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
घाबरू नका आरोग्यमंत्री, वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांचा सल्ला
कोविडचा विषाणू आणि एचएमपीव्ही विषाणूमध्ये मूलभूत फरक आहे. हा पसरणारा आजार नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, मात्र, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक तसेच गंभीर आजार असलेल्यांनी काळजी घ्यावी,असे आवाहन आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मंगळवारी मंत्रालयात पत्रकार परिषद घेऊन केले.
एचएमपीव्ही विषाणूंचे गेल्या वर्षात देशात १७२ रुग्ण आढळले. ज्यांना सर्दी, खोकल्याचा त्रास आहे किवा श्वसनाचे आजार आहेत, त्यांनी काळजी घेतली पाहिजे, स्वतःहून कोणतेही उपचार करू नये.या आजारावर प्रतिजैविके आवश्यक असून कोणतीही लस उपलब्ध नाही. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नयेत, असे आवाहन आबिटकर यांनी केले.
देशात ७ रुग्ण, राज्यांना निर्देश
चीनमध्ये उद्रेक झालेल्या ह्युमन मेटान्यूमो व्हायरसची (एचएमपीव्ही) नागपूरमधील दोन बालकांना लागण झाल्यानंतर देशातील रुग्णसंख्या ७ वर पोहोचली आहे.केंद्रीय आरोग्य सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राज्य व केंद्रशासित प्रदेशांची बैठक घेत आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला.
यावेळी राज्यांना इन्फ्लूएंजासारखे आजार आणि गंभीर श्वसन संसर्गावर बारकाईने लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले.देश श्वसनसंबंधी आजाराच्या प्रकरणांमध्ये कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज आहे.त्यामुळे लोकांनी घाबरण्याची गरज नाही, असे त्या म्हणाल्या. या विषाणूचा संसर्ग सामान्यतः सौम्य असून बहुतांश प्रकरणात रुग्ण आपोआप ठीक होतात, असे त्या म्हणाल्या.