कोरोना काळात सरकारी शाळांतील वाढलेली विद्यार्थी संख्या घटली !

Mahesh Waghmare
Published:

२९ जानेवारी २०२५ नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या काळात सरकारी शाळांमध्ये वाढलेली विद्यार्थ्यांची संख्या आता घसरल्याचे चित्र आहे.प्राथमिक शाळांमधील मुलांच्या प्रवेशाचे प्रमाण आता पुन्हा २०१८ सालच्या पातळीवर पोहोचले आहे.तर त्याचवेळी कोरोना काळात विद्यार्थ्यांचे शिकण्यासंबंधीचे झालेले नुकसान आता पूर्णपणे भरून निघाले आहे. उलट अनेक प्राथमिक वर्गांमधील मुलांच्या शिकण्याचा स्तर पूर्वर्वीपेक्षा चांगला झाल्याचे यासंबंधीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

मंगळवारी प्रकाशित झालेल्या वार्षिक शैक्षणिक स्थिती अहवाल (एएसईआर)-२०२४ नुसार सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या संख्येत घसरण नोंदवण्यात आली आहे. २०१८ साली सरकारी शाळांमधील ६ ते १४ वर्षे वयोगटातील बालकांच्या प्रवेशाचे प्रमाण ६५.६ टक्के इतके होते. कोरोना काळात हे प्रमाण वाढून २०२२ मध्ये ७२.९ टक्क्यांवर पोहोचले होते. परंतु, २०२४ साली हे प्रमाण घसरून ६६.८ टक्क्यांवर आले आहे.

तर त्याचवेळी ग्रामीण भारतात २००६ सालापासून खासगी शाळांमधील विद्यार्थी संख्येत सातत्याने वाढ नोंदवण्यात आल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. एएसईआर हे एक देशव्यापी ग्रामीण कौटुंबिक सर्वेक्षण आहे. देशातील ६०५ ग्रामीण जिल्ह्यांतील १७,९९७गावांमधील ६,४९,४९१ बालकांचा सर्वेक्षणातून आढावा घेण्यात आला होता.अहवालानुसार काही राज्यांनी विद्यार्थ्यांना शिकवण्याबाबतीत चांगली कामगिरी केली आहे. तर काही राज्ये अद्यापही महामारीच्या दुष्प्रभावातून सावरू शकली नाहीत. तरीही जवळपास सर्व राज्यांमध्ये २०२२ च्या तुलनेत सुधारणा दिसून आल्या आहेत.

सर्वेक्षणात प्रथमच समाविष्ट डिजिटल साक्षरतेच्या मुद्द्यानुसार १४ ते १६ वयोगटातील ८२.२ टक्के विद्यार्थ्यांना स्मार्टफोनचा वापर करता येतो. यापैकी ५७ टक्के विद्यार्थी शैक्षणिक उद्देशासाठी स्मार्टफोनचा वापर करत असल्याचे आढळले. तर ७६ टक्के सोशल मीडियासाठी स्मार्टफोन वापरत असल्याचे दिसून आले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe