बाईक चालवून आल्यानंतर पार्क केल्यानंतर अनेकदा आपण एक विशिष्ट टिक-टिक असा आवाज ऐकतो. हा आवाज बाईकच्या इंजिनाच्या दिशेने येत असल्यामुळे अनेकांना वाटते की काहीतरी समस्या आहे किंवा इंजिनमध्ये काहीतरी बिघाड झाला आहे. मात्र, हा आवाज पूर्णपणे नैसर्गिक असून त्यामागे विशिष्ट वैज्ञानिक कारण आहे.
हा आवाज कुठून येतो?
जेव्हा आपण गाडी चालवतो, तेव्हा इंजिन, एक्झॉस्ट (सायलेन्सर) आणि कॅटालिटिक कन्व्हर्टर हे घटक मोठ्या प्रमाणात तापतात. विशेषतः जर गाडी लांब अंतरावर, जास्त वेगाने किंवा उन्हात चालवली असेल, तर या भागांचे तापमान खूप वाढते.
गाडी बंद केल्यानंतर हे गरम झालेले भाग हळूहळू थंड होत जातात. थंड होताना मेटलचा प्रसरण (Expansion) आणि आकुंचन (Contraction) होण्याची प्रक्रिया सुरू होते. कारण मेटल गरम झाल्यावर विस्तारित होते आणि थंड होताना परत मूळ आकारात येऊ लागते. या प्रक्रियेमुळेच टिक-टिक असा आवाज ऐकू येतो.
सायलेन्सर आणि इंजिनमधील बदल
गाडीच्या सायलेन्सरमध्ये असलेल्या धातूच्या पत्र्यांमध्ये (Heat Shield) तापमान बदलांमुळे लहान लहान हालचाली होतात. त्यामुळेच सायलेंसरच्या मेटल प्लेट्समध्ये घर्षण होत राहते आणि टिक-टिक असा आवाज निर्माण होतो.
त्याचप्रमाणे कॅटालिटिक कन्व्हर्टर हा एक विशेष भाग असतो, जो बाईकमधून बाहेर पडणारे हानिकारक वायू नियंत्रित करतो. हा घटक देखील मोठ्या प्रमाणात तापतो आणि थंड होताना त्याचे घटक परत मूळ स्थितीत येताना टिक-टिक आवाज करतात.
सर्व बाईकमध्ये येतो का ?
सर्व बाईकमध्ये हा आवाज येतोच असे नाही. BS3 आणि त्यानंतरच्या नव्या मॉडेल्समध्ये हा आवाज अधिक स्पष्ट ऐकू येतो. कारण यामध्ये कॅटालिटिक कन्व्हर्टर आणि अतिरिक्त हीट शिल्डिंग असल्याने मेटलमध्ये जास्त हालचाली होतात. जुन्या BS2 किंवा BS1 इंजिन असलेल्या बाईकमध्ये हा आवाज फारसा ऐकू येत नाही, कारण त्यामध्ये कॅटालिटिक कन्व्हर्टर नव्हता आणि सायलेंसरच्या मेटलची जाडी जास्त होती.
गाडीच्या बिघाडाचे लक्षण ?
अनेक लोकांना भीती वाटते की हा आवाज म्हणजे गाडीमध्ये काहीतरी समस्या आहे, पण तसं अजिबात नाही. हा आवाज पूर्णपणे नैसर्गिक आहे आणि याचा गाडीच्या परफॉर्मन्सवर काहीही परिणाम होत नाही.
जर हा आवाज फार मोठा होत असेल, किंवा दीर्घकाळ (10-15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ) ऐकू येत असेल, तर एकदा मेकॅनिककडून तपासणी करून घ्यायला हरकत नाही.
तुम्ही काय करू शकता ?
- बाईक थोडी थंड झाल्यावर तिचा सायलेन्सर आणि इंजिन हलक्या हाताने स्पर्श करून पाहा, ती गरम असेल तर थंड होण्याची प्रक्रिया सुरू आहे.
- शक्यतो गाडी अचानक थांबवण्याऐवजी हळूहळू स्पीड कमी करत थांबवली तर तापमानाची त्वरित घट होण्याचा परिणाम थोडा कमी होतो.
- जर आवाज खूप वेगळा किंवा लांब वेळ सुरू असेल तर सर्व्हिसिंग दरम्यान मेटल फिटिंग आणि एक्झॉस्ट सिस्टमची तपासणी करून घ्या.
बाईक बंद केल्यानंतर येणारा टिक-टिक आवाज ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि तो मेटल थंड होत असताना होणाऱ्या आकुंचनामुळे येतो. त्यामुळे हा आवाज ऐकून घाबरण्याची किंवा काळजी करण्याची गरज नाही. तुमची गाडी व्यवस्थित चालत असेल आणि कोणतीही इतर समस्या नसेल, तर हा आवाज पूर्णपणे सामान्य आहे