५ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : राज्य शासनाच्या निर्देशानुसार अहिल्यानगर शहरात कर्करोग तपासणी व जनजागृती मोहीम महानगरपालिकेच्या वतीने राबवण्यात येत आहे. ४ फेब्रुवारी म्हणजेच मंगळवार पासून शहरात ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे पथक घरोघरी जाऊन, तसेच आरोग्य केंद्रात आढळणारे संशयित कॅन्सर रुग्ण शोधून त्यांना पुढील उपचारासाठी, शस्त्रक्रियेसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयाकडे पाठवणार आहेत.नागरिकांनी या मोहिमेला सहकार्य करून आरोग्य विभागामार्फत तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे.
मोहिमेदरम्यान प्रामुख्याने ३० वर्षावरील नागरिकांचे मौखिक,स्तन व गर्भाशयमुख कर्करोग तपासणी करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.जिल्हा शल्यचिकीत्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, महानगरपालिकेचे वैद्यकिय आरोग्य अधिकारी समन्वय साधून ही मोहीम राबवत आहेत.इंडियन मेडिकल असोसिएशन, इंडीयन डेंटल असोसिएशन, रोटरी क्लब, लायन्स क्लब, महाराष्ट्र कॅन्सर वॉरियर्स अशा संस्थांना या मोहिमेत सहभागी करून घेण्यात येणार आहे.
महानगरपालिकेने आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व कर्मचाऱ्यांचे पथक तयार केले आहे. घरोघरी जाऊन पथक नागरिकांची तपासणी करणार आहेत. महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रातही तपासणी केली जाणार आहे. संशयित रुग्ण आढळल्यास त्याला उपचार व गरज पाडल्यास शस्त्रक्रियेसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात येणार आहे. नागरिकांनी या पथकाला तपासणीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे.