Smartphone Tips : स्मार्टफोन आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वाढता वापर आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. मात्र, अनेक वापरकर्त्यांना असे जाणवते की आपण ज्या गोष्टींबद्दल बोलतो, त्याच उत्पादनांच्या जाहिराती आपल्याला दिसतात. त्यामुळे स्मार्टफोन आपल्या संभाषणावर लक्ष ठेवतो का? हा प्रश्न सतत उपस्थित होतो. जर असे होत असेल, तर ही गोष्ट थांबवण्याचे उपाय आहेत. स्मार्टफोनमधील योग्य सेटिंग्ज बदलून आणि काही सुरक्षा पद्धती अवलंबून तुम्ही तुमची गोपनीयता मजबूत करू शकता.
तुमचा स्मार्टफोन ऐकत आहे का? हे ओळखण्याचा सोपा मार्ग
अनेक अॅप्सना कॅमेरा, मायक्रोफोन आणि लोकेशनसाठी परवानगी दिली जाते. जर कोणताही अॅप तुमच्या परवानगीशिवाय मायक्रोफोन किंवा कॅमेरा वापरत असेल, तर तो तुमच्या डेटावर आणि संभाषणांवर लक्ष ठेवू शकतो. Android आणि iOS दोन्ही प्रणालींमध्ये जेव्हा कॅमेरा किंवा मायक्रोफोन सक्रिय होतो, तेव्हा स्क्रीनच्या वरच्या बाजूला हिरवा किंवा केशरी दिवा दिसतो. जर तुम्ही कोणत्याही अॅपचा वापर करत नसताना हा दिवा दिसत असेल, तर त्याचा अर्थ तुमच्या फोनचा मायक्रोफोन किंवा कॅमेरा तुमच्या नकळत वापरण्यात येत आहे.

१. अॅप परवानग्या व्यवस्थापित करा
स्मार्टफोनमध्ये अनेक अॅप्स कॅमेरा, मायक्रोफोन, लोकेशन, स्टोरेज यांसारख्या गोष्टींसाठी परवानगी मागतात. परंतु प्रत्येक अॅपला या सर्व गोष्टींची गरज नसते.
फोनच्या Settings > Privacy > Permission Manager (Android) किंवा Settings > Privacy & Security (iPhone) मध्ये जाऊन मायक्रोफोन, कॅमेरा आणि लोकेशन कोणत्या अॅप्सना वापरण्याची परवानगी आहे हे तपासा. गरज नसलेल्या अॅप्ससाठी ही परवानगी Disable करा.
२. सॉफ्टवेअर आणि सुरक्षा अपडेट्स वेळेवर करा
स्मार्टफोन कंपन्या आणि अॅप डेव्हलपर्स वेळोवेळी सुरक्षा अपडेट्स जारी करतात, जे नवीन हॅकिंग तंत्रांपासून तुमचा फोन सुरक्षित ठेवतात. जर तुम्ही तुमच्या स्मार्टफोनला किंवा अॅप्सना वेळेवर अपडेट करत नसाल, तर तुमच्या फोनमध्ये सुरक्षा त्रुटी (Vulnerabilities) राहू शकतात, ज्याचा फायदा सायबर गुन्हेगार घेऊ शकतात.
फोन आणि अॅप्स Auto-update मोडवर ठेवा किंवा Settings > Software Update मध्ये जाऊन अपडेट वेळेवर उपलब्ध आहेत का ते तपासा.
३. व्हॉइस असिस्टंट बंद करा
Google Assistant, Siri किंवा Alexa सारखे व्हॉइस असिस्टंट सतत ऐकण्याच्या स्थितीत असतात, त्यामुळे त्यांचा गैरवापर होऊ शकतो. जर तुम्ही हे फीचर वापरत नसाल, तर ते Settings मध्ये जाऊन बंद करा.
Google Assistant बंद करण्यासाठी:
Settings > Google > Settings for Google Apps > Search, Assistant & Voice > Voice Match > Hey Google बंद करा
Siri बंद करण्यासाठी:
Settings > Siri & Search > “Listen for Hey Siri” आणि “Press Side Button for Siri” बंद करा
४. सार्वजनिक Wi-Fi टाळा किंवा VPN वापरा
सार्वजनिक ठिकाणी मोफत Wi-Fi वापरणे धोकादायक असू शकते, कारण सायबर गुन्हेगार त्याद्वारे तुमच्या फोनमधील माहिती चोरण्याचा प्रयत्न करू शकतात. शक्यतो मोफत Wi-Fi टाळा, आणि VPN (Virtual Private Network) चा वापर करा.
VPN वापरल्याने
तुमचा डेटा एनक्रिप्ट होतो आणि सुरक्षित राहतो, तुमचे लोकेशन आणि इंटरनेट ब्राऊझिंग सुरक्षित होते, हॅकर्सना तुमच्या डिव्हाइसवर प्रवेश करणे कठीण होते.
५. थर्ड-पार्टी अॅप्स इन्स्टॉल करणे टाळा
काही वेळा वापरकर्ते Google Play Store किंवा Apple App Store ऐवजी थर्ड-पार्टी वेबसाइट्स किंवा अनोळखी अॅप स्टोअर्समधून अॅप्स डाउनलोड करतात. असे अॅप्स मालवेअर आणि स्पायवेअर असू शकतात, जे तुमचा डेटा हॅक करू शकतात. फक्त विश्वासार्ह अॅप स्टोअर्समधून (Google Play Store, Apple App Store) अॅप्स डाउनलोड करा आणि Settings मध्ये जाऊन Unknown Sources वरून अॅप इन्स्टॉल करण्याचा पर्याय बंद ठेवा.
६. फोन वेळोवेळी रीबूट करा
आठवड्यातून किमान एकदा फोन रीस्टार्ट करा. यामुळे, फोनमध्ये कोणत्याही प्रकारचे स्पायवेअर किंवा मालवेअर सक्रिय असेल, तर त्याचा प्रभाव थांबतो.
फोन रीबूट केल्याने: बॅकग्राउंडमध्ये चालणारे अनावश्यक अॅप्स बंद होतात, फोन फास्ट देखील होतो आणि RAM रिकामी होते,कोणताही सायबर थ्रेट किंवा हॅकिंग अटॅक अयशस्वी होतो.