Pune Metro : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी मेट्रोचे जाळे विकसित केले जात आहे. सध्या पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या मार्गांवर मेट्रो सुरू आहे. महामेट्रोकडून हे मेट्रोमार्ग संचालित केले जात आहेत.
दुसरीकडे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून शिवाजीनगर ते हिंजवडी यादरम्यान मेट्रो मार्ग विकसित केला जात असून हा पुण्यातील पहिलाच पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप तत्त्वावरील मेट्रो प्रोजेक्ट आहे.

पीपीपी तत्त्वावर विकसित होणारा हा मेट्रो मार्ग येत्या काही महिन्यात सर्वसामान्यांसाठी सुरू होण्याची शक्यता आहे. यामुळे शिवाजीनगर ते हिंजवडी दरम्यानचा प्रवास वेगवान होणार आहे. याशिवाय, पुणे शहरात मेट्रोसाठी अनेक नव्या मार्गाची घोषणा होत आहे.
स्वारगेट ते कात्रज या 5.4 किलोमीटर अंतराच्या विस्तारीत मार्गाचे काम सुद्धा येत्या काही दिवसांनी सुरू करण्यात येणार आहे. दरम्यान पुण्यात प्रस्तावित करण्यात आलेल्या सहा नव्या मेट्रोमार्गाच्या डीपीआरला महापालिकेकडून मंजुरी मिळाली आहे.
आज आपण पुणे शहरात प्रस्तावित असणाऱ्या कोणत्या सहा मेट्रोमार्गांना महापालिकेकडून मंजुरी मिळाली आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
या मेट्रोमार्गाच्या डीपीआरला महापालिकेकडून मंजुरी
मिळालेल्या माहितीनुसार महापालिकेने स्वारगेट ते खडकवासला, हडपसर ते खराडी, एसएनडीटी ते वारजे, रामवाडी ते वाघोली, वनाज ते चांदणी चौक, शिवाजीनगर ते हडपसर या 6 मेट्रो मार्गाच्या डीपीआरला मंजुरी दिलेली आहे.
हे 6 मेट्रो मार्ग एकूण 62 किलोमीटर अंतराचे आहेत. या मार्गाच्या डीपीआरला पुणे महापालिकेने नुकतीच मंजुरी दिली आहे. एवढेच नाही तर पुणे महापालिकेच्या माध्यमातून हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर ते सासवड रेल्वे स्टेशन या मार्गांनाही मान्यता देण्यात आली आहे.
ही सुमारे 90 किलोमीटरपेक्षा अधिक अंतराची मार्गिका राहणार आहे. नक्कीच हे प्रस्तावित करण्यात आलेले मेट्रो मार्ग पूर्ण झाले तर पुणेकरांना वाहतूक कोंडीतून मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे.
मेट्रो मार्गांमुळे पुण्यातील जनतेचा प्रवास अगदीच सुरक्षित आणि सुपरफास्ट होणार आहे. सध्या पुण्यात ज्या भागात मेट्रो सुरू आहे तेथील प्रवाशांकडून मेट्रोला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने पुण्यातील इतरही भाग मेट्रोने जोडले जात आहेत.