Maharashtra New Metro Line : महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर सारख्या शहरांमध्ये मेट्रो सुरू झाली आहे. ठाण्यातही येत्या काही दिवसांनी मेट्रोचे संचालन सुरू होणार आहे. दुसरीकडे मुंबई आणि पुण्यात मेट्रो मार्गांचा विस्तार सुरू आहे. असे असतानाच आता महाराष्ट्रातील सुवर्ण त्रिकोणातील आणखी एका शहराला मेट्रोची भेट मिळणार आहे.
नाशिक हे राज्यातील सुवर्ण त्रिकोणातील महत्त्वाचे शहर असून या शहराला आता मेट्रोची भेट मिळणार आहे. खरे तर, नाशिक मेट्रोचा विषय हा गेल्या पाच वर्षांपासून चर्चेत आहे. मात्र गेल्या पाच वर्षात नाशिक मेट्रो प्रकल्पाबाबत कोणतीच हालचाल झालेली नाही.

पण आता नाशिककरांचे मेट्रोचे स्वप्न लवकरच साकार होणार असे दिसत आहे. कारण शहरातील मेट्रो साठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या सूचनेने मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक महत्त्वाची बैठक संपन्न झाली असून ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडली आहे.
नाशिक मेट्रो प्रकल्पाबाबत काय आहेत डिटेल्स?
2019 मध्ये पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस यांनी देशातील पहिली टायरबेस निओ मेट्रो आपल्या नाशिकमध्ये सुरू करण्याची घोषणा केली होती. यानंतर दोन वर्षांनी म्हणजेच 2021 मध्ये या प्रकल्पासाठी केंद्राकडून 2000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली.
पुढे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले आणि हा प्रकल्प रेंगाळला. नंतर राज्यात शिवसेना भाजपाचे सरकार आले आणि त्यावेळी फडणवीस यांनी निओ मेट्रो किंवा शहराला सुसह्य ठरेल अशा पर्यायी मेट्रोच्या मॉडेलचा विचार सुरू असल्याचे सुतोवाच केले होते.
केंद्राने निधी दिला नाही तर प्रायोगिक तत्त्वावर 100 कोटी रुपयांचा खर्च एका विशिष्ट टप्प्यात मेट्रो सुरु करण्याची तयारी राज्य शासनाने दाखवली. मात्र, त्यानंतर निओ मेट्रोचे हे मॉडेल प्रभावी ठरणार नसल्याचे लक्षात आले आणि त्यामुळे हा प्रकल्प रद्द करण्यात आला.
यानंतर मग नाशिक शहरासाठी मेट्रोचे लाइट रेल ट्रान्झिट अर्थातच एलआरटी मॉडेलबाबत अभ्यास सुरू झाला. या अनुषंगाने राज्याचे मुख्य सचिव सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक महत्त्वाची बैठक संपन्न झाली आहे.
या बैठकीत केंद्र सरकारच्या महामेट्रोचे अधिकारी तसेच राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक पातळीवरील अधिकाऱ्यांशी समन्वय साधून नवीन मॉडेल तयार करावे, असा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे.
यामुळे नाशिककरांचे मेट्रोचे स्वप्न आता प्रत्यक्षात साकार होणार असे बोलले जाऊ लागले आहे. नक्कीच नाशिकमध्ये मेट्रो सुरू झाली तर शहरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात दूर होणार आहे आणि यामुळे शहरातील नागरिकांना दिलासा मिळेल असे म्हटले जात आहे.