Pune News : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांसाठी चिंतेचा बनतोय. शहरातील वाहतूक कोंडी सर्वसामान्यांसाठी जेवढी चिंतेची आहे तेवढीच सरकार साठी सुद्धा चिंतेची आहे. हेच कारण आहे की पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा निकाली निघावा यासाठी शासन आणि प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून शहरात मेट्रो सुरू करण्यात आली आहे. मात्र मेट्रो सुरु झाली असली तरी देखील मेट्रोचे जाळे अजून पर्यंत संपूर्ण शहरात पूर्णतः पसरलेले नाही आणि यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न अजूनही कायमच आहे.

दुसरीकडे वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा निकाली निघावा यासाठी शहरात दोन नवे रिंग रोड तयार केले जाणार आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाकडून एक अन पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून एक असे दोन रिंग रोड तयार होणार आहेत.
दरम्यान यातील पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून म्हणजेच पीएमआरडीए कडून विकसित होणाऱ्या रिंग रोड बाबत एक महत्त्वाचे अपडेट हाती आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार या रिंग रोड साठी आवश्यक असणाऱ्या जागेच्या संपादनाला सुरुवात झाली आहे.
पीएमआरडीएच्या अंतर्गत वर्तुळाकार रस्ता म्हणजेच इनर रिंग रोड प्रकल्पासाठीच्या जमीन मोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मंगळवारी पुणे जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून वडाचीवाडी या गावातील 16.5 हेक्टर जागेची मोजणी करण्यात आली आहे.
जमीन मोजणी प्रक्रियेला सुरुवात केल्यानंतर जमीन मालकांकडून जिल्हा प्रशासनाला संमतीपत्र देण्यास सुरुवात सुद्धा झाली आहे. तसेच आज बुधवारी 19 मार्च 2025 रोजी या प्रकल्पातील आंबेगाव खुर्द गावातील जमिनीची मोजणी केली जाणार आहे.
पीएमआरडीए चा रिंग रोड प्रकल्प हा 83 किलोमीटर लांबीचा असून यासाठी 14500 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. या रिंग रोड प्रोजेक्टसाठी जिल्ह्यातील खेड, हवेली, मुळशी आणि मावळ तालुक्यातील 45 गावांमधून 743.41 हेक्टर जमीन या रिंगरोडसाठी आवश्यक राहणार आहे.
दरम्यान यातील तेरा गावांमधील 115 हेक्टर जागेचे भूसंपादन जिल्हाधिकारी कार्यालयाने करावे यासाठीचा प्रस्ताव पीएमआरडी कडून नुकताच देण्यात आला होता आणि या प्रस्तावानुसार आता जमीन मोजणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की पी एम आर डी ए कडून भूसंपादनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाला 113 कोटी रुपये दिले जाणार असून यापैकी 30 टक्के रक्कम आधीच कार्यालयाकडे वर्ग झाली आहे.
पीएमआरडीएने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाला वडाची वाडी, भिलारेवाडी, पिसोळी, येवलेवाडी, मांगडेवाडी, गुजर-निंबाळकरवाडी, जांभूळवाडी, आंबेगाव खुर्द, निगरुडी, कदमवाकवस्ती, सोलू आणि वडगाव शिंदे या गावांमधील जमिनीचे भूसंपादन करण्याबाबतचा प्रस्ताव दिलेला आहे. त्यानुसार आता या संबंधित गावांमधील जमिनीची मोजणी केली जाणार आहे.