अहिल्यानगरमधील गुन्हेगारी घटनांची मालिका सुरूच आहे. आता एक खळबळजनक वृत्त हाती आले आहे. पत्नीला व सासूनेच आपल्या जावयाचा खून केला आहे. किरकोळ कारणावरून जावयाचा मारहाण करत खून करण्याचा प्रकार श्रीरामपुरात घडला आहे. याप्रकरणी कमल गोटीराम शिंदे (वय ४८) रा. सोनई, ता. नेवासा, हल्ली रा. बोनशेगाव, एमआयडीसी, नगर यांनी फिर्यादीने दिली आहे.
या फिर्यादीत म्हटले आहे की, आपला मुलगा सुनील शिंदे आणि सून यांच्यात किरकोळ कारणाने भांडणं होत असल्याने सून ही दोन्ही नातवांना घेवून श्रीरामपूर येथे आई-वडिलांकडे रहायला आली. नगरला मुलगा सुनील व मी राहत होते. नंतर मुलगाही श्रीरामपूर येथे मुलांबरोबर, पत्नीबरोबर राहायला आला. मात्र, पत्नीने नगरला रहायला यावे असा त्याचा आग्रह होता. त्यावरून त्यांचे भांडण होत होते.

शहरातील वॉर्ड नं.६ मधील साई मंदिराजवळ असणाऱ्या वाकचौरे यांच्या नवीन बांधकामाच्या ठिकाणी मुलगा व सून हे झोपडी करून वॉचमन म्हणून काम करत होते. एकेदिवशी साडूचा फोन आला आणि त्यांने सांगितले की, सुनील याने विषारी पदार्थ घेतला आहे. तेव्हा आम्ही श्रीरामपूर येथे आलो असता त्याचा मृतदेह साखर कामगार हॉस्पिटलमध्ये होता.
तेव्हा तेथे सुनील याने गळफास घेतल्याचे सांगण्यात आले. तेव्हा घटनास्थळी जावून पाहीले असता तेथे कोठेही फाशी घेण्यासारखी दिसली नाही. त्यामुळे आपल्याला संशय आला. त्यानंतर आता दोन दिवसांपूर्वी २४ मार्चला आपल्या नातवाला आपण विश्वासात घेवून विचारले असता आपला मुलगा सुनील याला त्याची पत्नी, सासू यांनी प्लास्टिक पाईपने व हाताबुक्क्यांनी मारहाण केली.
तसेच तो घराच्या बाजूला गेला तेव्हा सून व तिची आई हे देखील त्याच्या मागे गेल्याचे सांगितले. यावरून आपल्या मुलाचा कशानेतरी गळा दाबून त्याला ठार मारले असल्याचा संशय सुनीलची आई कमल शिंदे यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. यावरून पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.