Pune Expressway News : केंद्रीय महामार्ग रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रासाठी नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे. राज्याला आणखी एक नवा महामार्ग मिळणार आहे. पुण्यासहित संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याला जोडणारा एक नवा महामार्ग विकसित होणार असून या नव्या महामार्ग प्रकल्पामुळे सात तासांचा प्रवास अवघ्या दोन तासात पूर्ण होणार आहे.
पुणेकरांना लवकरच एक मोठी भेट मिळणार आहे. नितीन गडकरी यांनी पुणे ते छत्रपती संभाजीनगर या दरम्यान 15 हजार कोटी रुपये खर्चून एक नवीन महामार्ग तयार होणार असल्याची घोषणा केली आहे.

ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना नितीन गडकरी यांनी पुणे ते छत्रपती संभाजीनगर यादरम्यान नवा महामार्ग विकसित होईल आणि यामुळे सात तासांचा प्रवास फक्त दोन तासात पूर्ण होईल अशी माहिती दिली आहे.
यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील महामार्गावर होणारी वाहतूककोंडी टाळण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला असल्याचे सभागृहाला कळवले आहे.
ते म्हणाले की आगामी दोन वर्षात 2 पदरी रस्ते चार पदरी तर चार पदरी रस्ते सहा पदरी करण्यात येणार आहेत. देशातील जवळपास 25 हजार किलोमीटरचे दुपदरी रस्ते चौपदरी करण्यात येणार असल्याचेही गडकरी यांनी यावेळी सांगितले आहे.
एवढेच नाही तर त्यांनी रस्ते अपघातांसंदर्भातही चिंता व्यक्त केली आणि आपल्या महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये अपघातांची संख्या किती राहिली याचा एक डेटा प्रस्तुत करत हे अपघात नियंत्रणात राहावेत यासाठी सरकारची भूमिका काय ? याबाबत सरकारने काय निर्णय घेतलाय ? यासंदर्भातही सभागृहाला मोठी माहिती दिली आहे.
गडकरी म्हणालेत की, वाहनाचा जास्त वेग, गाडी चालवताना मोबाईलचा वापर, मद्यप्राशन करून वाहन चालवणे, चुकीच्या दिशेने वाहन चालवणे, सिग्नल तोडणे, हेल्मेट व सीटबेल्ट न वापरणे, रस्त्यांची खराब स्थिती यामुळे अपघात होतात. म्हणून अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी महामार्ग मंत्रालय उपाययोजना राबवत आहे.