पाथर्डी- सुट्यांचा हंगाम आणि लग्नसराई सुरू असतानाही पाथर्डी आगाराकडून लांब पल्ल्याच्या विशेष उन्हाळी गाड्या सुरू करण्यात आलेल्या नाहीत. विशेषतः अक्कलकोट, वैजापूर आणि पंढरपूर या मार्गांवरील गाड्या बंद असल्यामुळे प्रवाशांना प्रचंड गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. यामुळे या मार्गांवर गाड्या त्वरित सुरू करण्याची जोरदार मागणी करण्यात येत आहे.
आगाराचा निरूत्साह
कल्याण-विशाखापट्टणम हा राष्ट्रीय महामार्ग असूनही या मार्गावरून पाथर्डीहून थेट एकही बस चालत नाही. पाथर्डीमार्गे नांदेड, परभणी, माजलगाव अशा शहरांना जाणाऱ्या गाड्यांना परवानगी असतानाही त्या मार्गावर गाड्या चालवल्या जात नाहीत. बीड विभागाच्या पुण्याकडे जाणाऱ्या गाड्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद असून त्या पाथर्डीमार्गे जातात. तरीही पाथर्डी आगाराकडून नव्या मार्गांवर गाड्या सुरू करण्याबाबत उत्साह दिसून येत नाही.

पाथर्डी आगाराकडे सध्या १० नवीन लालपरी गाड्या असूनही त्या मुख्यत्वे मुंबई, कोल्हापूर आणि कल्याण या ठराविक मार्गांवरच धावत आहेत. संभाजीनगरहून दुपारी गाडी सोडून सायंकाळी परतीची व्यवस्था केली गेल्यास प्रवाशांना दिलासा मिळू शकतो, असा प्रवाशांचा विश्वास आहे.
परिवहन मंत्र्यांची भेट घेणार
विभागीय कार्यालयाने ‘कमी रूट, जास्त गाड्या’ असे कारण देत पाथर्डीच्या चार चालू गाड्या अन्य आगारांकडे वळवल्या आहेत. यामुळे स्थानिक अधिकाऱ्यांत नाराजी आहे आणि प्रवासी संघटना आक्रमक होत आहे. आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ लवकरच परिवहन मंत्र्यांची भेट घेणार असून, बंद गाड्या पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्न होणार आहेत.
पंढरपूला जाणारी गाडी बंद
पंढरपूर ही सर्वाधिक उत्पन्न देणारी सेवा असूनही तिथे जाणाऱ्या गाड्या जाणीवपूर्वक बंद करण्यात आल्या, असा आरोप प्रवाशांकडून होत आहे. अक्कलकोट गाडी सोलापूरमार्गे चालवण्याऐवजी बीडमार्गे चालवली गेली आणि नंतर तोट्याचे कारण पुढे करत तीही बंद करण्यात आली.
प्रशासनाचे दुर्लक्ष
पाथर्डीहून सुरत, इंदूर आणि हैदराबादसारख्या शहरांसाठी आंतरराज्य गाड्यांची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. मात्र, याकडे विभागीय कार्यालय आणि परिवहन मंडळ गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे चित्र आहे.
रात्रीची वाहतूक गरजेची
रात्री उशिरा नगर किंवा पुण्याहून पाथर्डीकडे येण्यासाठी गाड्या उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांना तिसगावपर्यंत यावे लागते. त्यानंतर खासगी वाहन किंवा इतर कोणत्याही उपलब्ध साधनाने पाथर्डी गाठावी लागते. त्यामुळे रात्री नऊच्या सुमारास पुण्याहून आणि दहाच्या सुमारास नगरहून पाथर्डीकडे येणाऱ्या गाड्या सुरू कराव्यात, अशी प्रवासी संघटनेची प्रमुख मागणी आहे.
संघटना आक्रमक
प्रवासी संघटनेचे उपाध्यक्ष संतोष जिरेसाळ यांनी स्पष्टपणे इशारा दिला आहे की, नगर विभागाने प्रवाशांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. अधिकाऱ्यांतील मतभेदाचा फटका प्रवाशांना बसत असल्यास, प्रवासी संघटना रस्त्यावर उतरेल. आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाची रूपरेषा आखली जात असून, लांब पल्ल्याच्या गाड्या पुन्हा सुरू करण्यासाठी दबाव वाढवण्यात येणार आहे.