Railway News : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. विशेषतः मुंबई ते पुणे आणि पुणे ते मुंबई असा रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही बातमी अधिक खास ठरणार आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्र राज्याचे राज्य राजधानी आहे तर पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे आणि याला शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखतात.
या दोन्ही शहरा दरम्यान मोठ्या प्रमाणात देवाणघेवाण सुरु आहे. मुंबई ते पुणे दरम्यान दैनंदिन प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच मोठी आहे. मुंबई ते पुणे या दरम्यान रस्ते मार्गाने प्रवास करणाऱ्यांची संख्या जेवढी मोठी आहे तेवढीच रेल्वे मार्गाने प्रवास करणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे.

दरम्यान हीच बाब विचारात घेऊन रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून मुंबई-पुणे दरम्यान रेल्वे प्रवास अधिक जलद व अडथळारहित करण्यासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले असून या प्रकल्पामुळे प्रवासाचा कालावधी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार रेल्वेच्या माध्यमातून कर्जत ते तळेगावदरम्यान चौथी आणि पाचवी नवीन मार्गिका उभारण्याचे नियोजन असून, यासाठी हजारो कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.
रेल्वेच्या या प्रकल्पासाठी सुमारे 9 हजार कोटींपेक्षा अधिक खर्च अपेक्षित असल्याची माहिती जाणकारांकडून समोर आली आहे. महत्वाची बाब म्हणजे 9000 कोटी रुपयांच्या या रेल्वेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे प्रवासाचा कालावधी तब्बल अर्ध्या तासांनी कमी होणार आहे.
या प्रकल्पाबाबत बोलायचं झालं तर या अंतर्गत सुमारे 60 किमी लांबीची या मार्गिका तयार केली जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या मार्गात 43 किमीचे बोगदे विकसित केले जाणार आहेत आणि त्यातील एक बोगदा हा 30 किमीचा राहणार आहे.
विशेष म्हणजे हा रेल्वे बोगदा देशातील सर्वात लांब रेल्वे बोगदा ठरणार असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की मुंबई ते पुणे दरम्यान रेल्वेने प्रवास करण्यासाठी सध्या घाटमाथ्यावर रेल्वेला अतिरिक्त इंजिन जोडावे लागते.
यामुळे मात्र प्रवाशांना अधिकचा वेळ लागतो. सध्याच्या मार्गामुळे वेळेचा आणि इंधनाचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. पण नवीन मार्गिकांमुळे ही अडचण दूर होणार असा विश्वास व्यक्त होत आहे. दरम्यान, या प्रकल्पाचा अंतिम आराखडा तयार झाला आहे.
विशेष बाब अशी की रेल्वे बोर्डाकडे हा आराखडा मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. आता या प्रस्तावाला मंजुरी कधी मिळणार हे पाहण्यासारखे ठरणार आहे. पण, मंजुरी मिळाल्यानंतर लगेच याचे काम सुरू होईल.
दुसरीकडे कर्जत-खोरावडी दरम्यानही एक नवीन मार्गीका तयार केली जाणार आहे. दरम्यान या मार्गिकेचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून त्याचाही आराखडा येत्या काही दिवसांनी तयार होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.