Indian Railway News : देशातील रेल्वे प्रवाशांचा प्रवास वेगवान व्हावा यासाठी भारतीय रेल्वेच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून देशात एक नवा रेल्वे मार्ग विकसित करण्यात आला आहे.
हा रेल्वे मार्ग 272 किलोमीटर लांबीचा असून या प्रकल्पामुळे देशाच्या एकात्मिक विकासाला चालना मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त होतोय. आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, भारताचा सर्वात थरारक आणि गुंतागुंतीचा कटरा-श्रीनगर रेल्वे मार्ग अखेर पूर्ण झाला आहे.

या रेल्वे मार्गाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून युद्ध पातळीवर सुरू होते आणि अखेरकार आता या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. खरेतर, या प्रकल्पासाठी रेल्वे प्रशासनाने, अधिकाऱ्यांनी आणि सरकारने मोठी मेहनत घेतली आहे.
आता, तब्बल 28 वर्षांच्या प्रयत्नानंतर भारतीय रेल्वेने हा स्वप्नवत वाटणारा अन जम्मू-काश्मीरच्या विकासासाठी अगदीच महत्त्वाचा असा प्रकल्प पूर्णत्वास नेला आहे. विशेष बाब अशी की याचे लोकार्पण उद्या अर्थातच 19 एप्रिल 2025 रोजी होणार आहे.
याचे लोकार्पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होईल अशी माहिती हाती आली आहे. दरम्यान आता आपण याच रेल्वे मार्ग प्रकल्पाची विशेषता थोडक्यात जाणून घेणार आहोत.
कसा आहे नवा रेल्वे मार्ग प्रकल्प ?
हा रेल्वेचा एक महत्त्वकांक्षी मार्ग असून जम्मू ते काश्मीर असा प्रवास यामुळे वेगवान होणार आहे. या रेल्वे मार्ग प्रकल्प बाबत बोलायचं झालं तर हा मार्ग जम्मू येथील श्री माता वैष्णोदेवी कटरा स्टेशनपासून श्रीनगरपर्यंत विकसित करण्यात आला आहे.
या मार्गावर एकूण 36 बोगदे आणि 979 पूल तयार करण्यात आले आहेत. या मार्गावर बांधण्यात आलेल्या बोगद्यांचे एकूण अंतर 119 किमी इतके आहे. हा रेल्वे मार्ग 272 किलोमीटर लांबीचा असून यापैकी जवळपास 119 किलोमीटर म्हणजे जवळपास 40% मार्ग हा बोगद्यांमधला आहे.
दरम्यान हा रेल्वे मार्ग सुरू झाल्यानंतर रेल्वे प्रवाशांना प्रवासादरम्यान बर्फाच्छादित डोंगरदऱ्यांचे विहंगम दृश्य सुद्धा पाहता येणार आहे. म्हणजेच हा रेल्वे मार्ग पर्यटनाला देखील चालना देणार आहे.
या प्रकल्पा अंतर्गत विकसित झालेला चिनाब नदीवरील पूल हा जगातील सर्वात उंच रेल्वे पूल असून, तो आयफेल टॉवरपेक्षा 35 मीटर उंच असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे.
दरम्यान, या मार्गावर देशातील पहिली सेमी हायस्पीड म्हणजेच वंदे भारत सेमी-हाय स्पीड ट्रेन चालवली जाणार आहे. दरम्यान या रेल्वे मार्गावर वंदे भारत ट्रेन सुरू झाल्यानंतर सात तासांचा प्रवास फक्त तीन तासात पूर्ण होण्याची शक्यता आहे.
महत्त्वाची बाब अशी की हवामान कसेही असले तरी या रेल्वे मार्गावरून प्रवाशांना कोणत्याही अडथळ्या विना प्रवास करता येणे शक्य होणार आहे.