चोंडी मंत्रिमंडळ बैठकीसाठी संपर्क अधिकाऱ्यांची नेमणूक, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांसाठी नेमले हे खास अधिकारी

चोंडी येथे ६ मे रोजी होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्र्यांशी समन्वय साधण्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. बैठकीच्या व्यवस्थेसाठी विविध समित्यांचेही व्यापक नियोजन करण्यात आले आहे.

Published on -

Ahilyanagar News: अहिल्यानगर : जामखेड तालुक्यातील चोंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने ६ मे रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीच्या तयारीसाठी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जिल्ह्यातील विविध अधिकाऱ्यांवर जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि प्रत्येक मंत्र्यासाठी स्वतंत्र संपर्क अधिकारी नियुक्त करण्यात आले असून, बैठकीच्या नियोजनासाठी अनेक समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.

अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या

या बैठकीच्या नियोजनासाठी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोर, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सागर चौधरी आणि जामखेडचे गटविकास अधिकारी राहुल शेळके यांच्यावर मुख्य नियोजन समितीची जबाबदारी आहे. स्वागत समितीचे नेतृत्व अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी शैलेश हिंगे, तहसीलदार धीरज मांजरे, श्रीगोंदा उपविभागीय अधिकारी श्रीकुमार चिंचकर आणि तहसीलदार मुदगल यांच्याकडे आहे.

निविदा प्रक्रियेची जबाबदारी

निविदा प्रक्रियेची जबाबदारी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत आधत, जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी शैलेश मोरे आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजू लाकुडझोडे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. समन्वयासाठी निवासी उपजिल्हाधिकारी अरुण उद्दे, उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे, गृह शाखेचे उपचिटणीस मयूर बेरड, सहायक महसूल अधिकारी स्वप्नील फलटणे, संदेश दिवटे आणि नीलेश सोनसळे हे काम पाहणार आहेत.

कार्यक्रमस्थळाच्या व्यवस्थेसाठी बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरत कुमार बाविस्कर, महावितरणचे अधीक्षक अभियंता रमेश पवार, रोजगार हमी विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप सौनकुसळे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब नन्नवरे, जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता चव्हाण, सुप्रिया कांडबळे, जामखेड नगर परिषदेचे सुरेश साळवे आणि उर्जा व कामगार विभागाच्या विद्युत निरीक्षक राजश्री गीते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वाहन व्यवस्थेसाठी अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, बांधकाम विभागाचे उपअभियंता शशिकांत सुतार, वाहतूक विभागाचे निरीक्षक बाबासाहेब बोरसे, मोटर वाहन निरीक्षक सावन पाटील आणि कर्जत नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षय जायभाय यांच्यावर जबाबदारी आहे.

स्वतंत्र समित्या स्थापन

याशिवाय, विश्रामगृह, कायदा व सुव्यवस्था, वाहतूक नियोजन, भोजन व्यवस्था, खाद्य पदार्थ तपासणी, वाहन चालक समन्वय, मीडिया, रांगोळी व सजावट, वैद्यकीय सेवा, अग्निशामन, पिण्याच्या पाण्याची स्वच्छता, सुरक्षा पास, विद्युत व्यवस्था, तांत्रिक कक्ष आणि आपत्ती व्यवस्थापन यासाठीही स्वतंत्र समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. प्रत्येक समितीला विशिष्ट अधिकाऱ्यांची नेमणूक करून कामाचे वाटप करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांसाठी स्वतंत्र अधिकारी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी विद्युत वितरणचे कार्यकारी अभियंता लक्ष्मण काकडे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी महापालिका आयुक्त यशवंत डांगे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी उत्पादन शुल्कचे उपअधीक्षक तेली हे संपर्क अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. प्रत्येक मंत्र्यासाठी स्वतंत्र संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बैठकीसाठी ६०० व्हीआयपी आणि सुमारे दोन हजार अन्य व्यक्तींसाठी भोजन, पाणी आणि इतर आवश्यक व्यवस्था करण्यात आल्या आहेत. या सर्व तयारीमुळे चोंडी येथील मंत्रिमंडळाची बैठक यशस्वी होईल, असा विश्वास जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe