Explained संगमनेर पंचायत समितीची निवडणूक यंदा चांगलीच रंगतदार होण्याची शक्यता आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून रखडलेल्या या निवडणुका येत्या दोन महिन्यांत होण्याची शक्यता आहे. अशा वेळी विद्यमान आ. अमोल खताळ हे पुन्हा एकदा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना कडवे आव्हान देतील, अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. संगमनेरच काय पण संगमनेर तालुक्यातील सर्वच संस्थांवर गेल्या 40 वर्षांची थोरातांची सत्ता आहे. मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीत अनपेक्षित पराभव झाल्यानंतर थोरात विरोधकांना बळ मिळाले आहे. अशा स्थितीत संगमनेर पंचायत समितीत काय होईल, याकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. काय होईल, संगमनेर पंचायत समितीत? याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट…

संगमनेर पंचायत समितीच काय, पण संगमनेर तालुक्यातील सर्व सहकारी व इतर संस्थांवर ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातांचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे. 1985 मध्ये पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर थोरातांनी कधीच पराभव पाहिला नव्हता. एकदा अपक्ष व त्यानंतर सलग सहा टर्म, त्यांनी संगमनेरमध्ये काँग्रेसचा पंचा कायम राखला. काँग्रेसचा हा पंचा नुसता विधानसभेपुरता मर्यादीत नव्हता. तर संगमनेर तालुक्यातील सर्व छोट्या-मोठ्या संस्था या आजही थोरातांच्या ताब्यात आहेत. परंतु गेल्या विधानसभेला या तालुक्यात अनपेक्षित निकाल लागला. शिवसेनेचे अमोल खताळ यांनी विधानसभेला विजय मिळवला. त्यानंतर थोरात विरोधकांना ताकद मिळाली व सध्या थोरात-खताळ गटात जोरदार संघर्ष पहायला मिळत आहे.
संगमनेर पंचायत समितीत नव्या रचनेनुसार एका गटाची व दोन गणांची भर पडली. संगमनेरमध्ये जिल्हा परिषदेचे 10 गट व पंचायत समितीचे 20 गण झाले आहेत. गेल्यावेळी संगमनेर पंचायत समितीच्या 18 गणांसाठी निवडणूक झाली होती. त्यावेळी थोरात गटाला 13 तर विरोधकांना फक्त 5 जागा मिळाल्या होत्या. गेल्यावेळी असलेल्या काही गटांची व गणांची नावे बदलून यंदा नवीन गट व गण तयार झाल्याने थोरात समर्थकांची गोची होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अनेक गटांची व गणांची तोडफोड झाल्याने ही निवडणूक थोरात गटाला सोप्पी राहणार नसल्याचे सांगितले जात आहे. त्यात या मतदारसंघाचे ध्रुवीकरण झाल्याने ही निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दोन वर्षांपूर्वी जिल्हा परिषद गटांची व पंचायत समिती गणाची पुनर्रचना करण्यात आली. मागील वेळी संगमनेर तालुक्यात वडगाव पान, समनापूर, संगमनेर खुर्द, धांदरफळ, बोटा, साकूर, आश्वी, घुलेवाडी आणि जोर्वे हे जिल्हा परिषदेचे गट होते. त्यात आता चंदनापुरी या नव्या गटाची भर पडली आहे. त्यामुळे यंदा संगमनेर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 10 जागांसाठी निवडणूक होणार आहे.
पंचायत समिती गणाचा विचार केला तर, संगमनेर तालुक्यात निमोण, समानापूर, तळेगाव, वडगाव पान, घुलेवाडी, गुंजाळवाडी, राजापूर, धांदरफळ बुद्रुक, संगमनेर खुर्द, सावरगाव तळ, आश्वी बुद्रुक, आश्वी खुर्द, जोर्वे, अंभोरे, साकुर, पिंपळगाव देपा, बोटा आणि आंबीखालसा हे पंचायत समितीचे 18 गण होते. त्यात आता पिंपळगाव देपा, आंबी खालसा, सावरगाव तळ हे पंचायत समितीचे गण बदलून त्या जागी नव्याने चंदनापूरी, पेमगिरी, वरवंडी आणि खंदारमाळवाडी हे नवे गण अस्तित्वात आले आहेत. यामध्ये कोकणगाव व पेमगिरी या नव्या गणांची भर पडली आहे. त्यामुळे आता संगमनेरमधून 10 पंचायत समिती सदस्य निवडले जाणार आहेत.
कोकणगाव व पेमगिरी या पंचायत समितीच्या दोन गणांत नव्या इच्छुकांची भर पडणार आहे. शिवाय नव्याने तयार झालेल्या जिल्हा परिषदेच्या चंदनापुरी गटातही चुरशीची निवडणूक होणार आहे. विशेष म्हणजे या नव्या गटात व गणात, अनेक जुन्या गट-गणांची तोडफोड करुन नवी गावे जोडली गेल्याने जुन्या नेत्यांची पंचायत होणार आहे. सत्ताधारी थोरात गटाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. गेल्यावेळी संगमनेर खुर्द हा नवा गट तयार करण्यात आला होता. त्यावेळीही पश्चिमेकडील गावांचा त्यात नव्याने समावेश करण्यात आला होता.
परंतु आत्ताच्या नव्या गट रचनेत संगमनेर खुर्द पुन्हा तुटला. त्यातील गावांचे विभाजन करुन चंदनापुरी गट नव्याने तयार झाला. गेल्यावेळी संगमनेर खुर्दमध्ये असलेली अनेक गावे नव्या चंदनापुरी गटाला जोडल्याने उमेदवारांचीच काय पण नेत्यांचीही दमछाक होणार आहे. चंदनापुरी गटात पठार भागातील गावे जोडली गेली आहेत. परंतु पठार भागात शिवसेनेचे कमी-अधिक प्रमाणात वर्चस्व असल्याने तेथे काय होते, हे येत्या काळात समजणार आहे. शिवाय संगमनेर खुर्द गटातील अनेक गावे नव्याने तयार झालेल्या चंदनापुरी गटात गेली आहे. शिवाय तळेगाव गटासह जोर्वे गटतील अनेक गावे संगमनेर खुर्दला जोडण्यात आली आहेत. त्यामुळे जुन्या उमेदवारांची पंचायत होणार आहे.
जुन्या गट व गणांची झालेली तोडफोड व जुन्या उमेदवारांची विस्तापित झालेली हक्काची गावे यामुळे यंदाच्या पंचायत समिती निवडणुकीत रंगत येणार आहे. पराभवानंतर थोरात गट व विजय मिळवल्यानंतर आ. खताळ गट हे दोन्हीही गेल्या दोन महिन्यांपासून कामाला लागले आहेत.