रेल्वेने प्रवास करणारे अनेजण आहेत. शिवाय सध्या सुट्यांच्या हंगामातही अनेकजण रेल्वे प्रवासाचा प्लॅन बनवत आहेत. रेल्वे प्रवास आवडणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी तिकीट बुकिंगशी संबंधित नियम पूर्वीपेक्षा अधिक कडक केले आहेत. हा बदल आपत्कालीन कोटा आरक्षणाअंतर्गत करण्यात आला आहे. आपत्कालीन कोट्याअंतर्गत चुकीच्या पद्धतीने तिकिटे बुकिंग होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर रेल्वेने हे नवे नियम जाहीर केले.
काय आहेत नवीन नियम
रेल्वे मंत्रालयाने सर्व 17 रेल्वे झोनना आपत्कालीन कोट्याअंतर्गत जागा बुक करण्यासाठी ट्रॅव्हल एजंट्सकडून कोणत्याही मागण्या मान्य करू नयेत, असे निर्देश दिले आहेत. 2011 मध्ये रेल्वेने या कोट्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. आता या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगण्यात आले आहे. नवीन नियमांनुसार, आपत्कालीन कोट्यासाठी लेखी विनंती केवळ राजपत्रित अधिकाऱ्याच्या स्वाक्षरीने स्वीकारली जाईल. विनंती करणाऱ्या व्यक्तीला त्याचे नाव, पद, फोन नंबर आणि एका प्रवाशाचा मोबाईल नंबर द्यावा लागेल.

रजिस्टरमध्ये नोंद होईल
रेल्वेने प्रत्येक अधिकारी, विभाग आणि महासंघाला एक रजिस्टर ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. या रजिस्टरमध्ये, आपत्कालीन कोट्याशी संबंधित सर्व विनंत्याचे तपशीलवार तपशील नोंदवले जातील. या माहितीमध्ये प्रवासाची तारीख, स्थान आणि विनंतीकर्त्याचा स्रोत इत्यादी माहिती समाविष्ट असेल. विनंतीवर रजिस्टरचा डायरी क्रमांक देखील लिहिला जाईल. प्रवाशांबद्दल योग्य आणि स्पष्ट माहिती देण्याची जबाबदारी विनंती पाठवणाऱ्या व्यक्तीची असेल.
एजंट्सवर घातला लगाम
रेल्वे मंत्रालयाने स्पष्टपणे सांगितले आहे, की ट्रॅव्हल एजंट्सकडून येणाऱ्या विनंत्या स्वीकारल्या जाणार नाहीत. अधिकाऱ्यांना चुकीच्या विनंत्या टाळण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. रेल्वेने प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस) ची नियमित तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. तिकीट दलाल आणि आरक्षण कार्यालयातील कर्मचाऱ्यांमधील संगनमत रोखण्यासाठी ही चौकशी केली जाईल. याशिवाय, सर्व विनंती पत्रे प्रवासाच्या तारखेपासून तीन महिन्यांपर्यंत सुरक्षित ठेवण्यास सांगण्यात आले आहे. या नवीन नियमांमुळे, रेल्वेचे उद्दिष्ट आपत्कालीन कोट्याचा गैरवापर थांबवणे आणि तिकीट बुकिंग अधिक पारदर्शक करणे आहे.