Pune News : पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे, ती म्हणजे पुढील महिन्यात पुणेकरांना एक नवीन डबल डेकर फ्लायओव्हरची भेट मिळणार आहे. खरंतर गेल्या काही वर्षांमध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या भेडसावंत आहे अन यामुळे पुणेकरांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय.
दरम्यान हेच वाहतूक कोंडीची समस्या दूर व्हावी यासाठी वेगवेगळे रस्ते विकासाचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत आणि सोबतच मेट्रोचे जाळे देखील मोठ्या प्रमाणात विस्तारले जात आहे.

शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघावा यासाठी शहरातील एका महत्त्वाच्या भागात डबल डेकर फ्लाय ओव्हर तयार केला जातोय आणि आता याच प्रकल्पाच्या संदर्भात एक नवीन अपडेट हाती आली आहे.
इथं तयार होतोय दुमजली उड्डाणपूल
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून पुणे युनीव्हर्सिटी चौकात दुमजली उड्डाणपूल विकसित केला जात असून याचे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे.
यामुळे हा प्रकल्प लवकरच सर्वसामान्यांसाठी खुला होण्याची शक्यता आहे. पुढील महिन्यात म्हणजे जून अखेरीस हा पूल नागरिकांसाठी खुला होणार असल्याचे या प्रकल्पाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
या दोन मजली उड्डाणपुलामुळे शहरातील गणेशखिंड रस्ता व शिवाजीनगर, औंध, बाणेर, पाषाण आणि हिंजवडी यांसारख्या प्रमुख भागांमधील वाहतूक सुरळीत होईल अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.
कसा आहे प्रकल्प ?
मिळालेल्या माहितीनुसार विद्यापीठ चौकात विकसित होणाऱ्या पूलाच्या गर्डरची लांबी सुमारे ५५ मीटर असून रुंदी १८ ते २० मीटर इतकी आहे. दरम्यान या उड्डाणपुलाचे बहुतांशी काम आता पूर्ण झाले आहेत.
प्रकल्प जवळपास अंतिम टप्प्यात पोहोचला आहे आणि म्हणूनच पाषाणच्या दिशेने असलेले रॅम्प वगळता उर्वरित रस्ता ३० जूनपर्यंत खुला होणार अशी माहिती एका प्रतिष्ठित वृत्तसंस्थेच्या माध्यमातून समोर आली आहे.
महत्वाची बाब अशी की, औंध आणि शिवाजीनगरकडे जाणारे रॅम्प २० मेपर्यंत वापरात आणले जाणार आहेत, तर औंध रॅम्प पूर्णपणे जूनमध्ये पूर्ण होणार आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेले सर्व ३२ आधार स्तंभ उभारण्यात आले असून, स्टील गर्डर बसवण्याचे काम सुद्धा वेगाने सुरू आहे.
दरम्यान, या प्रकल्पामुळे विद्यापीठ चौकातील वाहतुक सुरळीत होणार आहे आणि प्रवाशांचा बहुमूल्य वेळ वाचेल. यामुळे प्रदूषण नियंत्रणात येणार आहे.