Ladki Bahin Yojana : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही मध्यप्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेली एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेवरून सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू आहे. विरोधकांकडून या योजनेच्या बाबत सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
महिलांसाठी गेल्या शिंदे सरकारच्या काळात सुरु झालेल्या या योजनेत दरमहा 1,500 रुपये दिले जातात, म्हणजेच एका वर्षात या योजनेतून 18000 रुपये मिळतात. या योजनेअंतर्गत जुलै 2024 पासून प्रत्यक्षात पैसे दिले जात आहेत.

आतापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांना 10 हप्ते मिळालेले आहेत. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2024 आणि जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल 2025 या दहा हफ्त्याचा लाभ महिलांना मिळालेला आहे.
मात्र, विधानसभा निवडणुकीदरम्यान सुरू असणाऱ्या प्रचाराच्या काळात महायुतीकडून ‘सत्ता आल्यास 2100 रुपये देऊ’ अशी घोषणा करण्यात आली होती. महायुतीच्या अनेक नेत्यांनी ही घोषणा केली होती.
या नेत्यांमध्ये राज्याचे वर्तमान मुख्यमंत्री आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वर्तमान उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारख्या पहिल्या फळीतील नेत्यांचा समावेश होता.
पण, अद्याप यावर कोणताही निर्णय झालेला नसल्याने विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे. सोबतच महिला वर्गात देखील सरकारच्या विरोधात कमालीची नाराजी पाहायला मिळत आहे.
या पार्श्वभूमीवर विधान परिषदेच्या उपसभापती व शिंदे शिवसेना नेत्या नीलम गोन्हे यांनी एक मोठी माहिती देत विरोधकांवर टीका केली. त्यांनी या योजनेतून प्रत्यक्षात महिलांना कधीपासून 2,100 रुपये मिळणार याबाबत अपडेट दिली आहे.
काय म्हणाल्यात नीलम गोऱ्हे?
नीलम गोऱ्हे जालना येथे आल्या होत्या. या कार्यक्रमात बोलताना गोन्हे म्हणाल्यात की, “लाडक्या बहिणींच्या सन्मानासाठी गेल्या शिंदे सरकारच्या काळात ही योजना सुरु झाली असून, सरकार त्यांच्या मागण्यांचा योग्यवेळी विचार सुद्धा करणार आहे.
मात्र, विरोधकांकडून या योजनेच्या संदर्भात मुद्दाम महिलांमध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न होत आहे.” त्या पुढे म्हणाल्यात की, “महायुती सरकारने राज्यातील महिलांच्या स्वाभिमानासाठी जे पाऊल उचललं, त्याचा फायदा राज्यातील हजारो, लाखो महिलांना मिळालेला आहे. विरोधक फक्त खोटं नॅरेटीव तयार करून पसरवत आहेत.
लोकसभेत अपेक्षित यश न मिळाल्याने ते विधानसभेसाठीही निराशावादी भाकित करतांना दिसत होते. पण, प्रत्यक्षात राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला फारच चांगलं यश मिळालं आहे.” 2100 रुपयांबाबत बोलताना त्यांनी असे म्हटले की, मी ठीक-ठिकाणी महिलांसोबत बोलत आहे, त्याच्यांकडून मी माहिती सुद्धा जाणून घेत आहे.
दरम्यान, महिलांची जी काही 2100 रुपयांची मागणी आहे, त्यावर सरकार योग्यवेळी नक्कीच विचार करेल. पण, या योजनेवर विरोधकांचं विशेष लक्ष आहे, असं मला वाटतं, असा खोचक टोला यावेळी गोऱ्हे यांनी लगावला आहे.