सध्या महाराष्ट्रात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. पुणे, मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावत शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले आहे. त्यातच हवामान विभागाने एक आनंदाची बातमी दिली आहे. यंदा वेळेपूर्वीच मान्सून महाराष्ट्रात दाखल होत असल्याचे सांगण्यात आले आहे.
काय म्हणतंय हवामान विभाग?
हवामान विभागाने वर्तवविलेल्या अंदाजानुसार केरळमध्ये लवकरच मान्सून दाखल होणार आहे. IMD ने वर्तवलेल्या अंदाजानुसार, 25 मे च्या दरम्यान केरळमध्ये नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन होण्याची शक्यता आहे. मान्सूनच्या आगमनाचा इतिहास पाहता, यंदा आठ- दहा दिवस अगोदरच मान्सून केरळमध्ये दाखल होत आहे. यापूर्वी 16 वर्षांपूर्वी म्हणजेच 2009 साली मान्सून वेळेपूर्वी केरळमध्ये दाखल झाला होता. आता 16 वर्षांत पहिल्यांदाच मान्सून वेळेआधी दाखल होत आहे.

अवकाळी पावसाचा धुमाकूळ
सध्या अवकाळी पावसानं बळीराजाला चांगलेच सतावले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार अवकाळी पावसाचा मुक्काम अजून 3-4 दिवस राहणार आहे. या काळात राज्यात मुसळधार पाऊसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. हवामान विभागाकडून अनेक जिल्ह्यांना यलो व रेड अलर्ट देण्यात आला आहे. नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
कोकणात मुसळधार बसरणार
हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढचे 48 तास धोक्याचे आहेत. कोकणाला रेड अलर्ट देण्यात आला असून तेथे मुसळधार तर काही भागांत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईमध्ये सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे. पुण्यातही जोरदार पावसानं हजेरी लावली. पुढचे दोन दिवस पुणे व मुंबईला यलो अलर्ट देण्यात आला आहे.