Explained : रोहित पवार की राम शिंदे जामखेडमध्ये राजकारण शिगेला

Published on -

Explained Jaamkhed Politics : गेल्या सात- आठ वर्षांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच मार्ग आता मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने येत्या चार महिन्यांत या निवडणुका घेण्याचे सांगितल्यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या फळीतील नेत्यांच्या आशा वाढल्या आहेत. अहिल्यानगर जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील 14 पंचायत समिती निवडणुकांचा बिगूल आता लवकरच वाजणार आहे.

त्यात दोन पहिल्या फळीतील तगडे विरोधक असलेल्या जामखेड पंचायत समितीची निवडणूक चांगलीच रंगतदार होणार आहे. पंचायत समिती ताब्यात ठेवण्यासाठी आ. रोहित पवार व सभापती राम शिंदे यांच्यातील द्वंद्व पुन्हा एकदा रंगणार आहे. काय आहे जामखेड पंचायत समितीची स्थिती? भाजप पुन्हा झेंडा फडकवील काय? रोहित पवारांसाठी निवडणूक कशी असेल? याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट…

आठ वर्षांपूर्वी म्हणजेच 2017 साली नगर जिल्ह्यातील 14 पंचायत समितीच्यांच्या निवडणूक झाल्या होत्या. त्यावेळी जिल्हा परिषदेचे 73 व पंचायत समितीचे 146 गण होते. त्यानंतर महाविकास आघाडीच्या काळात लोकसंख्येच्या प्रमाणात गट व गणांची पुनर्रचना करण्यात आली. 2022 मध्ये झालेल्या या पनुर्रचनेत नगर जिल्हा परिषदेचे 85 गट व पंचायत समित्यांचे 170 गण तयार झाले.

म्हणजेच 50 हजार लोकसंख्येमागे असलेला गट आता थेट 30 ते 35 हजार लोकसंख्या असा तयार झाला. त्याच वेळी जिल्हा परिषद गट व गणांचे आरक्षणही जाहीर करण्यात आले होते. या आरक्षणात जिल्हा परिषदेतील अनेक दिग्गज नेत्यांना मतदारसंघच उरला नव्हता. आता हेच आरक्षण कायम राहते का? हा खरा प्रश्न आहे. आरक्षण व मतदार संघाची पुनर्रचना बदलली, तर मग मात्र या निवडणुकीत अजून रंगत येईल.

आता जामखेड तालुक्याचा विचार केला तर, गेल्यावेळी जामखेड पंचायत समितीचे चार गण व जिल्हा परिषदेचे दोन गट होते. त्यानंतर मतदारसंघ पुनर्रचनेत एक गट व दोन गण वाढले.
आता जामखेड तालुक्यातील जिल्हा परिषद गटांचे आरक्षण कसे होते, ते आपण पाहू…

1. साकत (इतर मागास वर्ग महिला)
2. खर्डा (इतर मागास वर्ग महिला)
3. जवळा (इतर मागास वर्ग)

आता जामखेड पंचायत समितीचे आरक्षण कसे होते ते आपण पाहू…

1. साकत गण- सर्वसाधारण
2. शिऊर गण- अनुसूचित जाती महिला
3. जवळ गण- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
4. अरणगाव गण- सर्वसाधारण
5. खर्डा गण- सर्वसाधारण
6. नान्नज गण- सर्वसाधारण स्त्री

मागील पंचवार्षिक निवडणुकीत जवळा जिल्हा परिषद गटातून सोमनाथ पाचर्णे, तर खर्डा गटातून वंदना लोखंडे यांनी बाजी मारली होती. हे दोन्ही सदस्य भाजपने निवडणूक आणले होते. तर पंचायत समितीच्या चार गणांतही भाजपने संधी साधली होती. सुरुवाचीचे अडीच वर्षे सुभाष आव्हाड हे सभापती होते. त्यानंतर राजकीय घडामोडी घडून राजेश्री सूर्यकांत मोरे या सभापती झाल्या. त्यावेळी त्यांच्या विरोधात भाजपचे मनीषा सुरवसे होत्या. या दोघींनाही समान मते पडल्याने अखेर चिठ्ठीतून मोरे यांचे नशिब उघडले होते. आता तालुक्यात जिल्हा परिषदेचा एक गट व पंचायत समितीचे दोन गण वाढले आहेत. आता नान्नज हा पंचायत समिती गण झाल्याने व तेथे सर्वसाधारण महिला आरक्षण निघाल्याने अनेक इच्छुकांनी आपल्या सौभाग्यवतींसाठी फिल्डींग लावली आहे.

यंदाही आ. रोहित पवार विरुद्ध सभापती राम शिंदे यांच्यात चांगलीच फाईट रंगणार आहे. गेल्या पाच वर्षांत जामखेड तालुक्याच्या राजकारणात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. रोहित पवारांच्या अनेक दिग्गज नेत्यांनी त्यांची साथ सोडली. तरीही 2024 च्या विधानसभा निवडणुकीत रोहित पवारांचा काठावर विजय झाला. त्यानंतरही पराभवानंतर भाजपने राम शिंदे यांना थेट विधान परिषदेचे सभापती केले. त्यामुळे रोहित पवार जिंकूनही राष्ट्रवादीच्या नेत्यांचा आनंद फार काळ टिकला नाही.

कारण त्यानंतर लगेच कर्जत नगरपंचायतीत सत्तांतर झाले. रोहित पवार व राम शिंदे यांच्यातील संघर्ष सध्या शिगेला पोहोचला आहे. राज्य पातळीवरील नेते असूनही रोहित पवार हे अजूनही त्यांच्याच मतदारसंघात अडकून पडले आहेत. भाजपची प्रत्येक चाल या मतदारसंघात यशस्वी होताना दिसत आहे. त्याऊलट पराभूत होऊनही भाजपने राम शिंदे यांना संपूर्ण ताकद दिल्याने तालुक्यात रोज काही ना काही घडताना दिसत आहे. केवळ चिठ्ठीमुळे गेल्यावेळी हातातून गेलेली पंचायत समिती भाजप पुन्हा ताब्यात घेईल का, हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News