Maharashtra Metro News : महाराष्ट्रातील मुंबई पुणे नागपूर सारख्या शहरांमध्ये मेट्रोचे संचालन सुरू झाले आहे. राज्यातील या प्रमुख शहरांमध्ये मेट्रो सुरू झाल्यामुळे येथील नागरिकांचा प्रवास हा फारच सोयीचा झालाय. यामुळे या संबंधित शहरांमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था फारच उत्तम बनलीये. दुसरीकडे या शहरांमध्ये सध्याच्या मेट्रो मार्गाचा विस्तार सुद्धा केला जातोय.
अशातच आता महाराष्ट्रातील आणखी एका नव्या शहरात मेट्रो सुरु होणार असल्याची बातमी समोर आली आहे. मुंबई जवळील बदलापूर शहर हा मेट्रो सुरु होणार असून यामुळे बदलापूर वासियांना जलद गतीने मुंबईमध्ये पोहोचता येणे शक्य होणार आहे. दरम्यान आज आपण बदलापूर शहरातून सुरू होणारा हा मेट्रो मार्ग नेमका कसा असेल याचा आढावा घेणार आहोत.

कसा असणार हा नवा मेट्रो मार्ग
कांजूरमार्ग ते बदलापूर दरम्यान 38 किलोमीटर लांबीचा नवा मेट्रो मार्ग विकसित होणार आहे. या मेट्रो मार्ग प्रकल्पासाठी जवळपास 18 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती समोर आली आहे.
कांजूरमार्ग ते बदलापूर अर्थातच मेट्रो मार्ग 14 ची उभारणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच एम एम आर डी ए कडून होणार आहे. महत्त्वाची बाब अशी की येत्या काही महिन्यांनी या प्रकल्पाचे काम प्रत्यक्षात सुरू होणार आहे.
या मेट्रो मार्गाचे बांधकाम पुढील बारा महिन्यात सुरु होईल अशी खात्रीलायक बातमी एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे. हा मेट्रोमार्ग दोन भागात विभागला गेलाय.
कांजूरमार्ग ते घनसोली आणि घनसोली ते बदलापूर अशा दोन भागात या प्रकल्पाचे काम केले जाईल. यातील कांजूरमार्ग ते घनसोली हा मार्ग अंडरग्राउंड म्हणजेच भूमिगत राहणार आहे. दुसरीकडे घनसोलीच्या पुढील मार्ग हा एलिव्हेटेड राहणार आहे.
या प्रकल्पाचा डीपीआर म्हणजेच सविस्तर प्रकल्प अहवाल तयार झालेला आहे. मिलान मेट्रो या सल्लागार कंपनीने याचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केलाये. या अहवालाला आयआयटी मुंबईने मान्यता सुद्धा दिलेली आहे. आता या प्रस्तावाला सरकारची मंजुरी घेतली जाणार आहे. नव्या मेट्रो मार्गामुळे प्रवास होणार वेगवान
कांजूरमार्ग – बदलापूर मेट्रो मार्गामुळे प्रवाशांचा प्रवास वेगवान होणार आहे. सध्या स्थितीला मुंबई आणि बदलापूर दरम्यान प्रवास करण्यासाठी प्रवाशांना जवळपास दीड ते दोन तासांचा वेळ लागतो. काही वेळा याहीपेक्षा अधिकचा वेळ लागतो.
मात्र हा प्रस्तावित करण्यात आलेला मेट्रोमार्ग सुरू झाला की मुंबई ते बदलापूर हा प्रवास अवघ्या 60 मिनिटांमध्ये पूर्ण होणार आहे. नक्कीच हा प्रकल्प मुंबई आणि मुंबई महानगर क्षेत्रातील विकासासाठी एक गेम चेंजर प्रकल्प ठरणार आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत या प्रकल्पामुळे मोठा अमुलाग्र बदल आपल्याला पाहायला मिळू शकतो.