Santiago Flight 513 : जगभरात रोज कोट्यवधी लोक विमानप्रवास करतात काहींना घरी जायचं असतं, तर काही जण नव्या ठिकाणी नवे अनुभव मिळवण्यासाठी निघालेले असतात. विमानात बसल्यावर आपल्याला खात्री असते की काही तासांत आपण आपल्या ठिकाणी पोहोचणार. पण कल्पना करा, एक विमान उड्डाण घेतं आणि तब्बल ३५ वर्षांनी पुन्हा पृथ्वीवर उतरले आणि त्यातून बाहेर काय निघालं, हे ऐकल्यावर अंगावर शहारा येईल.

सॅंटियागो फ्लाइट ५१३ ही एक अशीच रहस्यमय आणि विचित्र गोष्ट आहे, जी अजूनही अनेकांच्या मनात गूढतेचं वादळ निर्माण करते. १४ सप्टेंबर १९५४ रोजी हे विमान पश्चिम जर्मनीतील आचेन शहरातून ब्राझीलच्या पोर्टो अलेग्रे या शहराकडे रवाना झालं. प्रवास अंदाजे १८ तासांचा होता आणि त्यानुसार हे विमान दुसऱ्या दिवशी पोहोचायला हवं होतं. पण काही तासांनी या विमानाचा अटलांटिक महासागरावरून अचानक संपर्क तुटला आणि ते अक्षरशः हवेत विरून गेलं.
शेकडो शोधमोहिमा राबवले गेले, पण कोणताही ठावठिकाणा सापडला नाही. ना कोणते ढिगारे, ना कोणते शरीर, काहीच नाही. ही घटना केवळ एक दुर्घटना आहे असं मानून ती फाईल बंद करण्यात आली. पण खरं नाट्य तेव्हा घडलं, जेव्हा १२ ऑक्टोबर १९८९ रोजी तब्बल ३५ वर्षांनी पोर्टो अलेग्रे विमानतळावर एक जुने, ओळखीचं पण विसरलेलं विमान अचानक उतरलं.
विमानतळावर काम करणाऱ्यांना हे विमान कुठून आलं, कोण चालवतं होतं याचा काहीच अंदाज आला नाही. कंट्रोल टॉवरने अनेकदा संपर्क साधायचा प्रयत्न केला, पण कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी ते विमान उतरलं आणि जे काही दिसलं, ते कुणाच्याही कल्पनेपलीकडचं होतं.
त्या विमानाच्या आतलं दृश्य काळजाचा ठोका चुकवणारं होतं. सगळे प्रवासी ज्या जागेवर बसले होते, तिथेच त्यांचे सांगाडे होते. वैमानिकाचा सांगाडाही कॉकपिटमध्ये सापडला, हात अजूनही कंट्रोल्सवर होते. त्या क्षणी संपूर्ण विमानतळ सुन्न झाला. हे विमान खरंच १९५४ मधून १९८९ मध्ये वेळेच्या रेषा ओलांडून आलं होतं का?
जेव्हा ही बातमी ‘वीकली वर्ल्ड न्यूज’ या अमेरिकन टॅब्लॉइडने प्रसिद्ध केली, तेव्हा जगभरात खळबळ उडाली. काहींनी याला सत्य मानलं, काहींनी निव्वळ कल्पनाशक्तीचं खेळ समजलं. पण ती विमानयात्रा ३५ वर्षे कुठे होती, हे अजूनही कुणालाच माहीत नाही.
काही जण म्हणतात, हे ‘टाइम ट्रॅव्हल’चं प्रकरण असू शकतं. काही वैज्ञानिक मात्र याला अफवा मानून सोडून देतात. पण ज्यांनी हे विमान स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं, त्यांच्यासाठी ती गोष्ट कल्पनेपेक्षा भयावह होती.