विमानात बसताच ‘फ्लाइट मोड’ ऑन का करायला लावतात?, काय आहे यामागील कारण?

Published on -

विमान प्रवास करताना, सुरुवातीला क्रू सदस्यांकडून सतत सांगितले जाते “कृपया आपल्या मोबाईल फोनचा फ्लाइट मोड सुरू करा.” अनेक प्रवासी हे ऐकून मोबाईल साइलेंट करतात किंवा सहज फ्लाइट मोड लावतात, पण खरंच तुम्ही कधी विचार केला आहे का की यामागचं खरं कारण काय आहे? आणि जर फ्लाइट मोड लावला नाही, तर काही खरंच धोकादायक होऊ शकतं का?

जाणून घ्या कारण-

तुम्ही विमानात असताना तुमचा मोबाईल डिव्हाइस सतत नेटवर्क सिग्नल शोधत असतं. जमिनीवर असताना ही सर्च प्रक्रिया फारशी मोठ्या प्रमाणात घडत नाही, कारण नेटवर्क टॉवर अगदी जवळ असतात. पण हवेत, विशेषतः काही हजार फूट उंचीवर गेल्यावर, मोबाइल डिव्हाइस जोरजोरात रेडिओ सिग्नल शोधू लागते.

हाच मुद्दा विमानासाठी महत्त्वाचा ठरतो. कारण मोबाईलमधून बाहेर पडणारे हे सिग्नल विमानाच्या अत्यंत संवेदनशील नेव्हिगेशन आणि कम्युनिकेशन सिस्टममध्ये अडथळा निर्माण करू शकतात.

हे अडथळे पायलट आणि एअर ट्रॅफिक कंट्रोल यांच्यातील संवादात विघ्न घालू शकतात. कल्पना करा, पायलटला हवामानविषयक अपडेट मिळत आहे किंवा रनवेवर लँडिंगसाठी निर्देश येत आहेत, आणि त्याच वेळी डझनभर मोबाईल डिव्हाइस रेडिओ सिग्नल टाकत आहेत.

यातून अचूक संवादात अडचणी येऊ शकतात. यामुळे उड्डाणाच्या सुरळीततेवर परिणाम होऊ शकतो आणि काही टोकाच्या परिस्थितीत अपघाताचा धोका देखील संभवतो.

फ्लाइट मोड ऑन असण्याचे फायदे

त्यामुळेच, फ्लाइट मोड चालू करणे ही एक काळजीपूर्वक घेतलेली सुरक्षा पायरी आहे. फ्लाइट मोड लावल्यानंतर तुमचा फोन नेटवर्कशी संपर्क साधत नाही, कॉल्स किंवा मेसेजेस जात-येत नाहीत आणि त्यामुळे कोणताही सिग्नल विमानी यंत्रणेत हस्तक्षेप करत नाही.

आजकाल काही विमान कंपन्या फ्लाइट मोडवर असतानाही वाय-फाय किंवा ब्लूटूथ वापरण्याची मुभा देतात. मात्र, हे देखील एअरलाइनच्या विशेष परवानगीनेच शक्य होतं. म्हणजेच, यंत्रणा विमानाच्या सिस्टीमशी सुसंगत आहे याची खात्री करूनच अशी सेवा देण्यात येते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News