पाकिस्तानसारख्या आर्थिक संकटात सापडलेल्या देशात एक असाही व्यवसाय आहे, ज्याने सरकारलाही नव्या आशेचा किरण दिला आहे. हे वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल, पण पाकिस्तान आता गाढवे विकून कोट्यवधींची कमाई करत आहे. हा व्यवसाय फक्त स्थानिक पातळीवरच नाही, तर थेट आंतरराष्ट्रीय बाजारात पोहोचला आहे, आणि चीनसारख्या देशांनी त्याला प्रचंड मागणीने हात दिला आहे.

चीनकडून गाढवांची मोठी मागणी
गाढव हा प्राणी की ज्याला फारसं महत्त्व दिलं जात नाही, पण पाकिस्तानमध्ये मात्र त्याच प्राण्याच्या व्यापारातून मोठी उलाढाल होत आहे. देशातील अनेक गरीब कुटुंबांसाठी ही एक कमाईची मोठी संधी बनली आहे. गाढवांचा उपयोग डोंगराळ भागात सामान वाहण्यासाठी तर होतोच, पण त्याहून महत्त्वाचं कारण आहे, चीनकडून होणारी मागणी. चीनमध्ये गाढवाच्या कातडीपासून ‘एजियाओ’ नावाचं एक औषध बनवलं जातं, जे अशक्तपणा, रक्तक्षय, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं अशा अनेक आजारांवर उपयुक्त मानलं जातं. त्यामुळेच चीनला मोठ्या प्रमाणावर गाढवांची गरज भासत आहे, आणि पाकिस्तान ही गरज भागवण्यासाठी महत्त्वाचा पुरवठादार ठरतो आहे.
पाकिस्तानात गाढवांची सरासरी किंमत 30,000 ते 50,000 पाकिस्तानी रुपयांच्या आसपास असते. पण जर गाढव चांगल्या जातीचं असेल, तर त्याची किंमत सहज 2 लाख रुपयांपर्यंतही जाऊ शकते. या व्यवसायातून मिळणाऱ्या नफ्यामुळे अनेक लोक या क्षेत्रात उतरले आहेत. ग्रामीण भागात तर अनेक शेतकरी शेतीसोबत गाढवांचे पालन करून आपला उदरनिर्वाह करत आहेत. यामुळे केवळ व्यक्तिगत उत्पन्न वाढत नाही, तर देशाच्या अर्थव्यवस्थेलाही एक नवा आधार मिळतो आहे.
पाकिस्तानला 100 कोटींचा फायदा
खरंतर, पाकिस्तानमधील सुमारे 60 लाखांहून अधिक लोक थेट किंवा अप्रत्यक्षपणे गाढवांच्या व्यवसायाशी जोडले गेले आहेत. ही आकडेवारी पाहता लक्षात येतं की गाढवांच्या निर्यातीचं महत्त्व किती मोठं आहे. जरी यावर कोणताही अधिकृत आकडा उपलब्ध नसला, तरी काही अहवालांनुसार पाकिस्तान या व्यापारातून दरवर्षी सुमारे 100 कोटी रुपयांपर्यंत कमाई करत आहे, असं सांगितलं जातं.
हा व्यवसाय पाहता हे निश्चित म्हणता येईल की गरज, कल्पकता आणि व्यापार या तिघांच्या योग्य संगमातून एखादं दुर्लक्षित क्षेत्रही यशाचं मोठं दालन उघडू शकतं. पाकिस्तानने गाढवांसारख्या सामान्य प्राण्याच्या माध्यमातून आपल्यासाठी ही संधी शोधली आणि तिचं सोनं केलं.