राजस्थान आणि हरियाणाच्या सीमारेषेवर एक असं घर आहे, ज्याची रचना ऐकणाऱ्यालाही थक्क करून सोडते. तुम्ही म्हणाल, घर म्हणजे काय इतकं विशेष असणार? पण हो, हे घर खास आहे. कारण त्याचे दरवाजे दोन वेगवेगळ्या राज्यांत उघडतात! एक दरवाजा राजस्थानमध्ये तर दुसरा दरवाजा हरियाणामध्ये आहे. म्हणजेच एकाच घरातून दोन राज्यांचं दर्शन घडतं. हे घर केवळ भौगोलिकदृष्ट्या विलक्षण नाही, तर त्यामागची माणसांची कहाणीही तितकीच वेगळी आहे.

‘यामुळे’ घर ठरतेय खास
या घरात राहणारे दोन भाऊ ईश्वर सिंह आणि कृष्ण कुमार आपल्या कुटुंबासह गेल्या अनेक वर्षांपासून एकाच घरात राहत आहेत, पण दोन राज्यांचं वेगळं प्रशासन, योजना आणि राजकारण अनुभवत आहेत. घराची रचना अशी आहे की घरातील खोल्या, जेवणाची रूम आणि झोपण्याच्या जागा हरियाणात येतात, तर अंगण, बाथरूम आणि काही भाग थेट राजस्थानमध्ये आहे. त्यामुळं रोजच्या आयुष्यात दोन्ही राज्यांच्या नियमांशी त्यांना सामना करावा लागतो, पण त्यांचं हे जगणं अगदी सवयीचं झालं आहे.
गमतीची गोष्ट म्हणजे या घरातील एका भावाचं कुटुंब राजस्थान सरकारच्या योजनांचा लाभ घेतं, तर दुसऱ्या भावाचं कुटुंब हरियाणा सरकारच्या सुविधांचा लाभ घेते. एकाच घरात राहूनही दोघांची सरकारी कागदपत्रं, योजना, अगदी वाहनांचे क्रमांकही वेगवेगळे आहेत. दोघांची मुलेही स्थानिक राजकारणात सक्रिय आहेत. ईश्वर सिंह यांचा मुलगा हवा सिंह दयामा भिवाडी नगरपरिषदेत सलग तिसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आला आहे, तर कृष्ण कुमार धारुहेडा नगरपालिकेत दोनदा नगरसेवक राहिला आहे.
अनोख्या घराची नेहमी होते चर्चा
या घराच्या रचनेमुळे गावात हे घर नेहमीच चर्चेचा विषय असतो. गावकरी कौतुकाने पाहतात की, हे घर दोन वेगवेगळ्या राज्यांची ओळख असूनही, एका छताखाली दोन भाऊ प्रेमाने राहतात. त्यांचं आपसातील नातं कोणत्याही सीमारेषेपेक्षा मजबूत आहे. हे घर फक्त भिंती आणि दरवाज्यांनी वेगळं नसून, एकतेचं जिवंत उदाहरण आहे.
आपल्या देशात अनेक घरं असतील, पण असं घर विरळच. दोन वेगळ्या राज्यांचा अनुभव घेत, त्यात मिसळून गेलेली ही कुटुंबं आपल्याला दाखवून देतात की राज्यांच्या सीमा असल्या, तरी माणसांच्या मनांमध्ये सीमा नसतात.