लहान वयात केस पांढरे होणे ही हलकी-फुलकी गोष्ट राहिलेली नाही. पूर्वी वृद्धत्वाची नांदी समजल्या जाणाऱ्या या समस्येने आता तरुणाईलाही घेरले आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांपासून कॉलेजच्या तरुणांपर्यंत, अनेक जण केसांवर येणाऱ्या या वेळेआधीच्याच चांदीमुळे नाराज दिसतात. बाजारात उपलब्ध असलेल्या रंग, डाय आणि केमिकलयुक्त उत्पादनांचा वापर करून केस तात्पुरते काळे करता येतात, पण त्यामुळे केस अजूनच कोरडे, निर्जीव आणि निस्तेज होतात. मग पर्याय काय? उत्तर आहे घरगुती, नैसर्गिक आणि पारंपरिक उपाय.

नारळ तेल आणि काळी मेंदी
आपल्याला माहित आहे की, केसांना पोषण देण्यासाठी आणि त्यांची नैसर्गिक चमक टिकवण्यासाठी नारळाचे तेल हे फार प्रभावी असते. पण जर तुम्ही या तेलात काही खास घटक मिसळले, तर ते पांढऱ्या केसांना नैसर्गिकरित्या काळे करण्याचे काम करते. उदा., काळी मेंदी. ती फक्त केसांचा रंग बदलत नाही, तर त्यांना आवश्यक पोषणदेखील देते. यासाठी फक्त 2 चमचे नारळाचे तेल घ्या आणि त्यात 1 चमचा काळी मेंदी मिसळा. हे मिश्रण थोडं गरम करा, इतकंच की ते हाताला कोमट वाटावं. मग ते थोडं थंड झाल्यावर टाळूवर आणि केसांवर व्यवस्थित लावा. 1 ते 2 तास राहू द्या आणि नंतर सौम्य शाम्पूने धुवा. हे उपचार आठवड्यातून दोन वेळा केले तर काही आठवड्यांतच केसांमध्ये बदल जाणवू लागतो.
नारळ तेल आणि काळे तीळ
जर तुम्हाला अधिक प्रभावी आणि खोलवर परिणाम हवा असेल, तर नारळाच्या तेलात काळे तीळ वापरणे हा अजून एक प्रभावी उपाय आहे. 1 कप नारळाचे तेल घ्या आणि त्यात 2 चमचे काळे तीळ टाका. हे मिश्रण मंद आचेवर गरम करा. तीळ चांगले शिजेपर्यंत हे तेल हलवावे, नंतर गाळून बाटलीत साठवा. रोज रात्री झोपण्यापूर्वी याचा उपयोग करून केसांना हलकीशी मालिश करा. नियमित वापराने पांढरे केस हळूहळू गडद होऊ लागतात आणि केसांची मुळं मजबूत होतात.
यामागे कारणही स्पष्ट आहे, मेंदी आणि तीळ हे दोन्ही घटक केसांच्या मुळांना पोषण देतात आणि केसांत रंग निर्माण करणाऱ्या पेशींना सक्रिय ठेवतात. त्यातच नारळाचे तेल केसांच्या मुळांपर्यंत पोहोचून त्यांना गतीशील बनवते.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे, या उपायांमध्ये कोणतेही साईड इफेक्ट्स नाहीत. हे उपाय केवळ नैसर्गिक नसून, शेकडो वर्षांची परंपरा आणि अनुभव यातून सिद्ध झालेले आहेत. बाजारातील आकर्षक जाहिरातींपेक्षा घरच्या घरी बनवलेले हे साधे पण परिणामकारक तेल तुमच्या केसांना चमकदार आणि काळे बनवू शकतात.