घरबसल्या मतदार ओळखपत्र मिळवा, तेही फक्त 15 दिवसांत! जाणून घ्या ऑनलाइन अर्ज करण्याची संपूर्ण प्रोसेस

Published on -

मतदान हा केवळ एक अधिकार नाही, तर एक मोठं लोकशाही कर्तव्यही आहे. पण अनेकदा आपण आपल्या मतदार ओळखपत्रासाठी अर्ज करणं टाळतो, कारण ती प्रक्रिया खूप गुंतागुंतीची आणि वेळखाऊ वाटते. मात्र आता, भारतीय निवडणूक आयोगाने एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे, जे सामान्य नागरिकांसाठी खूपच दिलासादायक आहे. तुम्ही आता तुमचं मतदार ओळखपत्र घरबसल्या अवघ्या 15 दिवसांत मिळवू शकता.

पूर्वी मतदार कार्ड मिळवण्यासाठी अनेकदा महिन्यांचा कालावधी लागायचा. अर्ज केल्यावर कधी येणार , त्याची काही ग्वाही नसायची. मात्र, आता ही संपूर्ण प्रक्रिया डिजिटल झाली आहे आणि अधिक पारदर्शकही. निवडणूक आयोगाने मतदारांना अधिक सोयीस्कर सेवा देण्यासाठी ‘रिअल-टाइम ट्रॅकिंग’ आणि ‘एसएमएस अलर्ट’ यांसारखी सुविधा सुरू केली आहे. यामुळे प्रत्येक टप्प्यावर तुमचं कार्ड कुठे आहे, याची माहिती तुम्हाला मिळत राहते.

अर्ज कसा कराल?

नवीन मतदार कार्डसाठी अर्ज करताना तुम्हाला सर्वप्रथम NVSP (National Voter Services Portal) या अधिकृत वेबसाइटवर लॉगिन करावं लागतं. येथे तुमचं नाव, पत्ता, जन्मतारीख यांसारखी मूलभूत माहिती भरावी लागते. आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स यांसारखी ओळखपत्रं आणि अलीकडील फोटो अपलोड केल्यावर तुम्हाला एक संदर्भ क्रमांक मिळतो, ज्याच्या आधारे तुम्ही पुढे अर्जाची स्थिती ट्रॅक करू शकता.

यापुढे, कार्डाची निर्मिती, पाठवणं आणि वितरण या सगळ्या टप्प्यांवर तुम्हाला एसएमएसच्या माध्यमातून सूचना मिळत राहतील. ही पारदर्शकता नागरिकांचा वेळ वाचवते आणि प्रक्रिया अधिक विश्वासार्ह बनवते. विशेष म्हणजे, आता ही सेवा केवळ मोठ्या शहरांपुरती मर्यादित न राहता ग्रामीण भागातही सहज उपलब्ध आहे.

आवश्यक कागदपत्रं

मतदार कार्डासाठी अर्ज करताना लक्षात ठेवा की तुमचं वय 18 वर्षे पूर्ण झालेलं असावं आणि किमान एक सरकारी ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्याशिवाय, अर्ज करताना फोटो स्पष्ट असावा, कारण तोच कार्डावर झळकतो.

ही नवीन पद्धत म्हणजे केवळ डिजिटल इंडिया मोहिमेचा भाग नाही, तर ही नागरिक आणि सरकार यांच्यातील विश्वास वाढवणारी एक मोठी पायरी आहे. आता कुठल्याही कार्यालयाच्या चकरा न लावता, किंवा कुठेही ओळखी लावण्याची गरज न पडता, प्रत्येक नागरिक आपलं मतदार कार्ड अगदी सुलभतेने मिळवू शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!