वेटिंग तिकीटबाबत रेल्वेने बदलला नियम, आता कन्फर्म तिकीट थेट…; जाणून घ्या प्रवाशांना काय फायदे मिळणार?

भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी आणि प्रवास अनुभव अधिक चांगला व्हावा यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. ट्रेनमध्ये जागा नसतानाही मोठ्या संख्येने प्रवाशांना प्रतीक्षा यादीत ठेवण्याच्या जुन्या पद्धतीला आता पूर्णविराम मिळणार आहे. खास करून अशा लोकांसाठी ही बातमी अत्यंत दिलासादायक आहे ज्यांना वारंवार वेटिंग लिस्टमुळे प्रवास रद्द करावा लागतो किंवा अनिश्चिततेत राहावं लागतं.

रेल्वेचा नवीन नियम काय?

रेल्वेने नुकताच एक नवा नियम लागू केला आहे, ज्यामुळे वेटिंग तिकीटांची संख्या आता ट्रेनच्या क्षमतेनुसार ठरवली जाणार आहे. याआधी एकाच डब्यात शेकडो वेटिंग तिकिटे काढली जात असत, त्यामुळे ट्रेनमध्ये ओव्हरबुकिंग आणि अनधिकृत प्रवास वाढत होता. यामुळे खऱ्या अर्थाने कन्फर्म तिकीट असलेल्यांना बसण्यास अडचणी येत असत. पण आता प्रत्येक कोचमधील वेटिंग तिकिटांची संख्या फक्त त्या डब्याच्या 25% पर्यंत मर्यादित ठेवण्यात येणार आहे. म्हणजे, जर एखाद्या डब्यात 100 सीट्स असतील, तर केवळ 25 वेटिंग तिकिटांचीच परवानगी असेल.

हा निर्णय नवा असून, सध्या जेव्हा गर्दीचा हंगाम असतो म्हणजेच सण किंवा सुट्टीचा काळ तेव्हा स्लीपर कोचमध्ये 300 ते 400 पर्यंत प्रतीक्षा यादी पोहोचत असे. एसी कोचमध्येही 150 हून अधिक वेटिंग नोंदी होत. त्यामुळे अनेकदा प्रवासी तिकीट कन्फर्म नसतानाही प्रवास करत आणि अधिकृत प्रवाशांच्या जागांवर अडथळा आणत. आता मात्र रेल्वेने या प्रकारावर अंकुश ठेवण्याचा निश्चय केला आहे.

या नव्या नियमाची अंमलबजावणी AC First Class, AC 2nd Tier, AC 3rd Tier, Sleeper आणि चेअर कार कोचेससाठी केली जाणार आहे. त्यात दिव्यांग, महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी असलेल्या राखीव जागा मात्र पूर्ववत राहतील आणि त्यांना या नव्या मर्यादेचा फटका बसणार नाही. शिवाय, जे प्रवासी सरकारी वॉरंटच्या आधारे किंवा सवलतीवर प्रवास करतात त्यांनाही या नियमातून वगळण्यात आलं आहे.

काय फायदे मिळणार?

मात्र या धोरणामागे एक आर्थिक विचारही आहे. आजवर प्रतीक्षा यादीच्या तिकिटांमधून रेल्वेला मोठ्या प्रमाणात महसूल मिळत होता. एक लांब पल्ल्याची ट्रेन विचारात घेतली, तर स्लीपर कोचेसमधून मिळणाऱ्या वेटिंग तिकिटांचं प्रमाण 50% पर्यंत पोहोचत असे. पण या उत्पन्नाच्या बदल्यात प्रवाशांच्या सोयीचा विचार दुर्लक्षित होत होता. आता रेल्वेने अधिक उत्तरदायी भूमिका घेतली आहे.

या निर्णयामुळे एकीकडे प्रवास अधिक नियोजित होईल, तर दुसरीकडे प्रवाशांच्या मनातील गोंधळ आणि असमाधान दूर होण्यास मदत होईल. रेल्वेचा प्रवास अधिक सुरक्षित, विश्वासार्ह आणि सुसंगत करण्याच्या दिशेने हा एक सकारात्मक टप्पा मानला जात आहे.