गडद रंगाची जीन्स म्हणजेच काळ्या, निळ्या किंवा इतर डार्क शेड्सची जीन्स एकदा का कपाटात आली की ती आपली फेवरेट बनते. पण तीच जीन्स धुतल्यानंतर जर तिचा रंग फिकट होऊ लागला, तर मन नाराज होणं अगदी साहजिक आहे. पण काळजी करू नका. तुमच्या आवडत्या गडद रंगाच्या जीन्सचा रंग टिकवून ठेवण्यासाठी काही अत्यंत साधे पण प्रभावी उपाय आहेत, जे तुमचा खर्च आणि त्रास दोन्ही वाचवतील.

साबणाने धुणे टाळा
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जीन्स खरेदी केल्यानंतर लगेचच ती साबणाने धुणे टाळा. विशेषतः नव्याने विकत घेतलेल्या काळ्या किंवा गडद निळ्या जीन्स डिटर्जंटमध्ये टाकल्याने, तिच्या रंगाचे सूक्ष्म अणु पाण्यात विरघळतात आणि तुमचा नवाकोरा पेहराव काही दिवसांतच फिकट होतो. त्यामुळे सुरुवातीलाच सावधगिरी बाळगा.
मीठ आणि व्हिनेगर
जीन्स धुण्याच्या अगोदर ती उलटी करून धुण्याचा सल्ला अनेक तज्ज्ञ देतात, आणि त्यामागचं कारणही स्पष्ट आहे. जेव्हा जीन्सची रंगीत बाजू आतमध्ये राहते, तेव्हा डिटर्जंटचा थेट रंगावर परिणाम होत नाही. त्यामुळे तुमची जीन्स जास्त काळ नव्यासारखी दिसते.
या सोबतच, पहिल्यांदाच जीन्स धुताना ती मीठ आणि पांढऱ्या व्हिनेगरमिश्रित पाण्यात 2-3 तास भिजवून ठेवा. या सोप्या कृतीमुळे रंग ‘सेट’ होतो आणि पाण्यात मिसळण्याची शक्यता कमी होते.
जीन्स डिटर्जंटमध्ये भिजवत ठेऊ नका
एक चूक अनेक लोक वारंवार करतात ती म्हणजे, जीन्स डिटर्जंटमध्ये खूप वेळ भिजवून ठेवतात. हाच अतिरिक्त वेळ रंगावर घातक ठरतो. अर्धा तास पुरेसा असतो. त्याहून जास्त वेळ जीन्स भिजवली, तर तिच्या रंगाचे सूक्ष्म कण निघून जाऊ शकतात आणि कपड्याचा घट्टपणा देखील कमी होतो.
जीन्स वारंवार धुणं टाळा
पण या सगळ्यात सर्वात सोपी आणि प्रभावी सवय म्हणजे जीन्स वारंवार धुणं टाळणं. जीन्स हे असे कपडे आहेत, जे रोजच्या वापरात असूनही लगेच घाण होत नाहीत. फक्त विशिष्ट डाग किंवा वास येत असल्यासच ती धुवा. दर वेळेस फुल वॉश देण्याची गरज नसते. तसेच जीन्स धुण्यासाठी नेहमी थंड पाण्याचा वापर करा. गरम किंवा कोमट पाण्यामुळे फक्त घाणच निघत नाही तर रंग देखील वाहून जातो.