Pune News : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील मेट्रो ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. आज शहरातील एका महत्त्वाच्या मेट्रोस्थानकाचे उद्घाटन केले जाणार आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की सध्या स्थितीला पुणे शहरात दोन महत्त्वाचे मेट्रो मार्ग कार्यान्वित आहेत.
पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या मार्गांवर सध्या स्थितीला मेट्रो धावताना दिसते. या मेट्रो मार्गाचे संचालन महा मेट्रो कडून सुरू आहे. महत्त्वाची बाब अशी की या मार्गांचे विस्तारीकरण देखील केले जात आहे.

तर दुसरीकडे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून पीपीपी तत्त्वावर म्हणजेच पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप तत्वावर शिवाजीनगर ते हिंजवडी दरम्यान मेट्रो मार्ग विकसित केला जातो आणि लवकरच हा सुद्धा मेट्रो मार्ग प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.
दरम्यान आता पहिल्या टप्प्यातील पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट या मेट्रो मार्गावरील एका महत्त्वाच्या मेट्रो स्थानकाचे लोकार्पण केले जाणार आहे.
या मेट्रो स्थानकाचे लोकार्पण होणार
आज 21 जून 2025 रोजी पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट या मेट्रो मार्गावरील खडकी मेट्रो स्थानकाचे लोकार्पण केले जाणार आहे. या मेट्रो स्थानकाबाबत बोलायचं झालं तर हे स्थानक हे खडकी रेल्वे स्थानकाच्या अगदी जवळ आहे.
महत्त्वाची बाब अशी की या मेट्रोस्थानकातून खडकी रेल्वे स्टेशन ला जाण्यासाठी मार्ग सुद्धा विकसित करण्यात आला आहे. म्हणजेच या स्थानकात मेट्रो आणि रेल्वेच्या वाहतुकीचे एकत्रीकरण होईल असे आपण म्हणू शकतो. यामुळे या परिसरातील नागरिकांना मेट्रोचा तसेच रेल्वेचा लाभ घेणं सुलभ होणार आहे.
नव्या मेट्रो स्थानकाचा कोणाला सर्वाधिक फायदा होणार?
पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट या मेट्रो मार्गावरील खडकी रेल्वे स्थानक आजपासून सर्वसामान्य प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. हे स्थानक सुरु झाल्यामुळे खडकी, पुणे विद्यापीठ आणि औंध या भागातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट या मार्गावर प्रवास करणाऱ्या मेट्रो प्रवाशांना आता खडकी, पुणे विद्यापीठ, औंध आयटी पार्क, खडकी कॅन्टोन्मेंट, खडकी बाजार, रेंज हिल, औंध रस्ता, ऑर्डीनन्स फॅक्टरी हॉस्पिटल, मुळा रस्ता अशा महत्त्वाच्या ठिकाणी पोहचणे सोयीस्कर होणार आहे.
खडकी मेट्रो स्थानक सेवेत येत असल्याने या परिसरातील नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले आहे. या स्थानकामुळे खडकी व आजूबाजुच्या परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.