Pune New Flyover : पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पुणे शहराला आणखी एक नवीन फ्लायओवर मिळणार आहे. सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी नवीन उड्डाणपुल विकसित केला जात असून या प्रकल्पाचे काम एकूण तीन टप्प्यात केले जात आहे.
दरम्यान आता याच प्रकल्पाच्या बाबत एक नवीन माहिती समोर आली आहे. खरेतर, सिंहगड उड्डाणपूल प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याचे काम रखडले आहे.

पुणे महापालिकेने यंदा 15 जून 2025 रोजी या उड्डाणपुलाचे उद्घाटन करण्याचे जाहीर केले होते. पण नियोजित वेळेत या प्रकल्पाचे काम पूर्ण होऊ शकले नाही. यामुळे आता हा प्रकल्प कधीपर्यंत पूर्ण होणार हा मोठा सवाल आहे.
कसा आहे प्रकल्प ?
खरेतर, सततच्या पावसामुळे सिंहगड उड्डाणपुलाच्या कामाला विलंब झाला आहे. हे काम 15 जून पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता होती मात्र नियोजित वेळेत त्याचे काम पूर्ण झाले नाही आणि आता हे काम जुलै महिन्याच्या अखेरीस पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या प्रकल्पांतर्गत माणिकबाग ते हिंगणे दरम्यान सुमारे दीड किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल बांधला जात आहे. दरम्यान, या उड्डाणपुलाच्या तिसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यानंतर सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल, असा विश्वास महापालिकेकडून व्यक्त करण्यात आला आहे.
तथापि, हवामानाच्या प्रतिकूल स्थितीमुळे कामाचा वेग संथ झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात पावसाचा जोर वाढलाय आणि यामुळे या प्रकल्पाचे काम थोडे स्लो झाले आहे.
पण आता या प्रकल्पाचे काम जवळपास अंतिम टप्प्यात आले आहे आणि लवकरच हे काम पूर्ण होईल अशी अशा व्यक्त करण्यात आली. सिंहगड उड्डाणपूल प्रकल्पाबाबत बोलायचं झालं तर याची सुरुवात सप्टेंबर 2022 मध्ये झाली होती.
हा संपूर्ण उड्डाण पूल प्रकल्प 118 कोटी रुपयांचा आहे. 118 कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प एकूण तीन टप्प्यांत विकसित केला जात आहे. या प्रकल्पाचे दोन टप्पे आधीच पूर्ण झाले आहेत आणि ते टप्पे सर्वसामान्यांसाठी खुले आहेत.
या उड्डाणपूल प्रकल्पाचा पहिला टप्पा (राजाराम पूल चौक) आणि दुसरा टप्पा (विठ्ठलवाडी कमान ते फनटाइम थिएटर) पूर्ण झाले असून त्यांचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले होते.
पण या प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याचे काम रखडल्यामुळे प्रवाशांना अजून काही काळ ताटकळत राहावे लागणार आहे. महापालिकेने जुलै अखेरीपर्यंत हे काम पूर्ण करून पुल वाहतुकीसाठी सुरू करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.