पुणे व सोलापूर रेल्वे मंडळांतर्गत संसदीय रेल्वे समितीची महत्त्वपूर्ण बैठक आज पुणे येथील विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयात (डीआरएम ऑफिस) पार पडली. या बैठकीत अहमदनगर (अहिल्यानगर) लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश ज्ञानदेव लंके यांनी आपल्या मतदारसंघातील दीर्घ प्रलंबित आणि जनतेच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित असलेल्या महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पांना तातडीने गती देण्याची ठाम भूमिका मांडली.
या बैठकीला संसद सदस्य म्हणून खासदार डॉ. सुप्रिया सुळे, खासदार श्रीरंग आप्पा बारणे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, खासदार डॉ. शिवाजी काळगे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, खासदार भाऊसाहेब वाघचौरे, आणि खासदार विशाल पाटील यांनीही आपल्या-आपल्या मतदारसंघातील रेल्वे संदर्भातील गरजा व मागण्या मांडल्या.

तसेच मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री. धरमवीर मीना,
मुख्य वरीष्ठ संचालन अधिकारी श्री. श्याम सुंदर गुप्ता,
मुख्य वाणिज्य व्यवस्थापक श्री. अरविंद मालखेड़े,
मुख्य अभियंता श्री. राजनीश माथूर,
मुख्य प्रशासकीय अधिकारी (बांधकाम) श्री. अवनीश कुमार पांडे, पुणेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री. राजेश कुमार वर्मा, सोलापूरचे डीआरएम डॉ. सुजीत मिश्रा, उपमहाव्यवस्थापक श्री. के. के. मिश्रा,
मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील निला यांच्यासह रेल्वे विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
खासदार निलेश लंके यांनी मांडलेले ठळक मुद्दे:
नगर–पुणे इंटरसिटी ट्रेन तातडीने सुरू करावी, ही हजारो प्रवाशांची दीर्घकालीन मागणी असून यासाठी त्यांनी संसद आणि मंत्रालय पातळीवर सातत्याने पाठपुरावा केलेला आहे.
– अहिल्यानगर–पुणे व छत्रपती संभाजीनगर–अहिल्यानगर रेल्वे मार्गांच्या डीपीआरला त्वरित मंजुरी देऊन काम सुरू करावे.
– सुपा औद्योगिक वसाहतीमध्ये अत्याधुनिक मालधक्का व रेल्वे स्टेशनची निर्मिती करावी.
– कोरोना काळात बंद करण्यात आलेल्या पॅसेंजर गाड्या पुन्हा सुरु कराव्यात.
– अमृत भारत स्टेशन योजनेतील प्रगतीबाबत स्पष्ट माहिती द्यावी.
– निंबळक आणि वांबोरी येथील मंजूर उड्डाणपुल प्रकल्पांची सद्यस्थिती जाहीर करण्यात यावी.
– साईनगर शिर्डी–मुंबई ट्रेन दैनंदिन चालविण्यात यावी.
– दिव्यांग प्रवाशांना UDID कार्ड पास म्हणून मान्य करण्यात यावे.
– अहमदनगर विभागासाठी स्वतंत्र रेल्वे सल्लागार समिती गठीत करण्यात यावी.
– रेल्वे परिसरातील अस्वच्छता, अवैध व्यवसाय, व मद्यपान यावर नियंत्रण ठेवून स्वच्छता व सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्यात याव्यात.
ड्रीम प्रोजेक्टससाठी ठाम पाठपुरावाखासदार लंके म्हणाले,
“नगर–पुणे रेल्वे मार्ग, छत्रपती संभाजीनगर–अहिल्यानगर रेल्वे प्रकल्प, आणि इंटरसिटी ट्रेन सेवा हे माझे ड्रीम प्रोजेक्ट आहेत. या प्रकल्पांमुळे मतदारसंघातील जनतेस प्रवास, व्यवसाय, शिक्षण आणि रोजगाराच्या संधी वाढून सामाजिक–आर्थिक विकासास चालना मिळेल. या प्रकल्पांची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करत आहे.”
बैठकीदरम्यान खासदार लंके यांनी एक गंभीर बाब उपस्थित करत स्पष्ट सांगितले की, त्यांच्या मतदारसंघातील विविध प्रकल्प हे ते स्वतः संसदेत आणि मंत्रालयात वेळोवेळी मांडत असतानाही, काही वृत्तपत्रांमध्ये हे प्रकल्प इतर लोकांच्या नावे प्रसिद्ध केले जात आहेत, आणि दुर्दैवाने रेल्वे विभागाकडून त्यांच्याच नावाने इतरांना पत्रव्यवहार देखील केला जात आहे.
खासदार लंके यांनी त्याच संदर्भातील वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेली बातमी प्रत्यक्ष बैठकीत अधिकाऱ्यांना दाखवली आणि याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. “ही बाब गंभीर असून, यामुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण होतो. अशा प्रकारच्या चुकीच्या श्रेयवाटपाची जबाबदारी रेल्वे प्रशासनाने घ्यावी, आणि यापुढे असे प्रकार घडू नयेत,” अशी ठाम मागणी त्यांनी केली. सदर बाबतीत संपूर्ण नोंद बैठकीच्या अधिकृत प्रोसिडिंगमध्ये घेण्यात यावी, असे स्पष्टपणे त्यांनी सांगितले.
सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा
या बैठकीत रेल्वे प्रशासनाने अनेक मुद्द्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत कार्यवाहीचा आढावा देण्याचे आश्वासन दिले. स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन प्रकल्पांची अंमलबजावणी करण्याची आवश्यकता खासदार लंके यांनी अधोरेखित केली.