गॅस, अपचन, दातदुखी…हिंगचे औषधी उपयोग तुम्हाला माहितेय का?, फायदे ऐकून थक्क व्हाल!

Published on -

प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात आढळणारं एक अत्यंत प्रभावी औषध म्हणजे हिंग. अन्नाची चव वाढवण्यासाठी आपण हिंगाचा वापर करतोच, पण त्याचबरोबर हे आपल्याला आरोग्यदायी लाभ देखील देतं, हे अनेकांना माहितच नसतं. हिंग फक्त स्वयंपाकापुरता मर्यादित नाही, तर औषधपाण्याच्या गोष्टींमध्ये याला खास स्थान आहे. अगदी लहानशा चिमूटभर हिंगात आरोग्याचा एक मोठा खजिना लपलेला आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

हिंगमधील औषधी गुणधर्म

हिंगला औषधी गुणधर्म लाभलेले आहेत, आणि ते फक्त पारंपरिक अनुभवांवर नाही, तर आधुनिक संशोधनांवर आधारितही सिद्ध झालं आहे. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या अहवालानुसार, हिंग हे डांग्या खोकला, दमा, पोटदुखी, पोट फुगणे, ब्राँकायटिस, अल्सर आणि अगदी इन्फ्लूएंझा यांसारख्या अनेक त्रासांवर प्रभावी उपाय मानलं जातं. अनेक वेळा, गॅस, अपचन किंवा पोट बिघडल्यावर आपण हिंगपाणी देण्याचा उपाय ऐकतो,यामागे असलेले विज्ञान आणि अनुभवाचा पाया ही त्याची ताकद आहे.

हिंग हे ‘फेरुला हिंग’ या वनस्पतीतून मिळतं. त्याचा सुगंध खूप तीव्र असतो. ते प्रामुख्याने अफगाणिस्तान, इराण, उझबेकिस्तान या देशांमधून भारतात आयात केलं जातं. पण त्याचा वापर आपल्या स्वयंपाकात, विशेषतः वरण, फोडणी आणि भाज्यांमध्ये केला जातो. आयुर्वेदात, हिंगला ‘त्रिदोष नाशक’ म्हटलं जातं. म्हणजेच ते वात, पित्त आणि कफ या तीनही दोषांना संतुलित करतं.

हिंगचे आरोग्यदायी फायदे

पचनतंत्र सुधारण्याबाबत बोलायचं झालं, तर जेवणात हिंग घालणं हा एक अतिशय सोपा आणि प्रभावी घरगुती उपाय आहे. भूक न लागणे, पोटात गॅस होणे, अपचन, पोट फुगणे अशा सामान्य वाटणाऱ्या पण त्रासदायक समस्यांवर हिंग तात्काळ आराम देतो. एवढंच नाही, तर हिंगमुळे आतड्यांमधील सूज कमी होते आणि पचनक्रिया सुलभ होते.

हिंगचा उपयोग फक्त पोटापुरता नाही, तर दातदुखीवरही तो अतिशय प्रभावी ठरतो. दातदुखी झाल्यास हिंग आणि कापूर एकत्र करून त्या ठिकाणी लावल्यास काही मिनिटांत आराम मिळतो. तसेच तिळाच्या तेलात हिंग उकळून, त्या तेलाचे काही थेंब कानात घातल्यास डोकेदुखी आणि कानदुखीच्या त्रासावरही फायदा होतो.

इतकंच नाही तर मधुमेह किंवा रक्तदाब यांसारख्या आजारांवरही हिंग अत्यंत लाभदायक आहे. संशोधनातून सिद्ध झालं आहे की हिंग शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण वाढवण्यास मदत करतं आणि त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते. त्यात असलेले कौमरिन नावाचे घटक रक्ताला पातळ ठेवण्याचे काम करतात आणि त्यामुळे उच्च रक्तदाब, हृदयरोग यांसारख्या समस्यांचा धोका कमी होतो.

प्रसूतीनंतर महिलांना गर्भाशय स्वच्छ ठेवण्यासाठी, पोटातील विकार कमी करण्यासाठीही हिंग फार उपयुक्त ठरतं. एक कप कोमट पाण्यात थोडंसं हिंग टाकून प्यायल्यास मायग्रेन, डोकेदुखी आणि मानसिक ताण देखील कमी होतो, असं आयुर्वेदात सांगितलं जातं.

मात्र एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हिंग हा जरी गुणकारी असला, तरी काही लोकांना त्याची ऍलर्जी असू शकते. विशेषतः लहान मुलांना किंवा संवेदनशील पचन असलेल्या लोकांनी हिंग वापरण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!