कधी तुम्हाला असं वाटतं का, की प्रयत्न भरपूर करत असतानाही आर्थिक स्थिती तशीच उभी आहे? घरात पैसा टिकत नाही, नवनवीन खर्च उगाच निर्माण होतात? अशा वेळी आपण अनेक मार्ग शोधतो. कधी वास्तुशास्त्र, तर कधी काही पारंपरिक उपाय. याच अनुषंगाने, फेंगशुई ही चिनी शास्त्रीय कला आपल्या जीवनात आर्थिक स्थैर्य आणि समृद्धी आणण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते.

धातूचा कासव
फेंगशुईनुसार, काही विशिष्ट वस्तू घरात ठेवल्यास केवळ सकारात्मक ऊर्जा वाढत नाही, तर पैशाचा प्रवाहही सुरळीत होतो. उदाहरणार्थ, कासव. चिनी परंपरेत कासवाला दीर्घायुष्य, स्थिरता आणि धनसंपत्तीचे प्रतीक मानले जाते. तुम्ही धातू किंवा दगडाचे कासव उत्तर दिशेला किंवा बेडरूममध्ये ठेवू शकता. जर ते पाण्याच्या भांड्यात असेल आणि त्याचे तोंड घराकडे असेल, तर ते आर्थिक स्थैर्य वाढवते, असे मानले जाते.
मत्स्यालय (Aquarium)
तसेच, मत्स्यालय देखील फारच प्रभावी मानले जाते. आग्नेय कोपऱ्यात ठेवलेले मत्स्यालय संपत्तीचे क्षेत्र जागृत करतं. यात 8 सोनेरी आणि 1 काळा मासा ठेवल्यास घरात पैशाचा प्रवाह वाढतो, असं सांगितलं जातं. मात्र पाण्याची स्वच्छता आणि मास्यांचे आरोग्य राखणेही तितकेच महत्त्वाचे आहे, अन्यथा सकारात्मकतेऐवजी नकारात्मक ऊर्जा वाढू शकते.
फेंगशुई बेडूक
मनी बेडूक म्हणजेच नाणे तोंडात धरलेला फेंगशुई बेडूक हा आणखी एक प्रसिद्ध उपाय आहे. मुख्य दरवाजाजवळ, घराच्या आत डोके करून ठेवलेला हा बेडूक संपत्तीला घरात खेचून आणतो, असा विश्वास आहे.
फेंगशुई नाणी
याचबरोबर, फेंगशुई नाणी विशेषतः 3 किंवा 9 नाणी लाल रिबनमध्ये बांधून ठेवणे हे शुभतेचे प्रतीक मानले जाते. तुम्ही ती तिजोरीत, पर्समध्ये, किंवा घराच्या आग्नेय दिशेला ठेवू शकता. या जुन्या चिनी नाण्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा खेचून घेण्याची शक्ती असल्याचं म्हटलं जातं.
स्फटिक बॉल
शेवटी, एक सुंदर ,चमकदार, स्वच्छ आणि गोल असा स्फटिक बॉल हा तुमच्या घरात सौख्य, संतुलन आणि आर्थिक स्थैर्य आणण्यासाठी उपयोगी पडतो. तो तुम्ही बैठक खोलीत किंवा ईशान्य दिशेने ठेवू शकता.