जगभर फिरण्याचं स्वप्न अनेकांचं असतं, पण बजेटची चिंता सगळ्यांच्या मनात घर करून बसलेली असते. परदेशात प्रवास म्हणजे हजारो रुपये खर्च करावा लागेल, अशी एक ठाम समजूत आजही खूप लोकांच्या मनात आहे. पण अलीकडेच व्हायरल झालेल्या एका अनोख्या अनुभवाने ही धारणा बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एका भारतीय प्रवाशाने व्हिएतनाममध्ये फक्त ₹160 मध्ये एसी रूमसह आलिशान हॉटेलमध्ये मुक्काम करून लोकांना आश्चर्यचकित केलं आहे.

व्हिएतनाममधील पर्यटन
हा अनुभव आहे व्हिएतनाममधील फु क्वोक या निसर्गरम्य बेटावरील ‘लीफ हॉटेल’चा. एका भारतीय प्रवाशाने येथे फक्त ₹159.02 (परवाना आणि कर समावेश करून) मध्ये एक डबल किंवा ट्विन रूम बुक केली. सोशल मीडियावर त्याने शेअर केलेले फोटो आणि व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून, अनेक जणांना यावर विश्वास बसत नाही इतका हा स्वस्त सौदा वाटत आहे. लोक तर म्हणू लागले की ही रूम भारतातील एक कप कॉफीपेक्षाही स्वस्त आहे.
या प्रवाशाच्या म्हणण्यानुसार, खोली आकाराने लहान होती, पण पूर्णपणे स्वच्छ आणि आरामदायी होती. क्वीन-साईज बेड, मोफत वाय-फाय, भरपूर चार्जिंग पॉइंट्स, 24 तास चेक-इनची सुविधा, चांगली हवा खेळती राहील असा वेंटिलेशन आणि पार्किंगची सोयदेखील होती. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, तिथलं स्टाफ अत्यंत शांत आणि मैत्रीपूर्ण होतं, ज्यामुळे संपूर्ण अनुभव अधिकच सुखद झाला.
व्हिएतनामी चलन
या हॉटेलचं मूळ भाडं ₹578 होतं, पण एका मोठ्या 75% सवलतीनंतर ते केवळ ₹144 वर आलं. कर धरून अंतिम किंमत ₹159.02 झाली. यामागे एक कारण म्हणजे भारतीय रुपयाच्या तुलनेत व्हिएतनामी डोंग या चलनाची किंमत कमी आहे. त्यामुळे तिथले दर आपल्याला अधिकच स्वस्त वाटतात. त्याशिवाय, फु क्वोक हे एक ऑफबीट आणि तुलनेनं कमी गर्दीचं पर्यटनस्थळ असल्याने, हॉटेलचे दरही खूप परवडणारे आहेत.
व्हिएतनाम हा देश आता भारतीय बजेट ट्रॅव्हलर्ससाठी ‘स्वर्ग’ ठरत आहे. स्ट्रीट फूड, स्थानिक वाहतूक, स्वस्त होमस्टे आणि सुंदर निसर्गमय ठिकाणं यामुळे, फक्त ₹25,000 च्या आत संपूर्ण व्हिएतनाम ट्रीप शक्य होते. हनोई, हो ची मिन्ह सिटी, दा नांगसारख्या शहरांव्यतिरिक्त, लहान गावं किंवा किनाऱ्यावरील बेटं यांना भेट देणं अधिक किफायतशीर आणि अनुभवसंपन्न ठरतं.
राहणं, खाणं आणि फिरणं एकदम स्वस्त
तिथे स्ट्रीट फूडची किंमत फक्त ₹50 ते ₹200 दरम्यान असते, आणि सार्वजनिक वाहतूक किंवा सायकल भाड्याने घेण्याचा खर्च ₹15 ते ₹60 प्रति किलोमीटर इतकाच येतो. हे सगळं ऐकून भारतीय प्रवाशांचा कल पर्यटनासाठी व्हिएतनामकडे अधिक वाढत चालला आहे.