भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या जीवनात अनेक अद्भुत कथा गुंफलेल्या आहेत. आपण गणेश आणि कार्तिकेय या त्यांच्या पुत्रांविषयी तर जाणतोच, पण फारच कमी लोकांना माहिती आहे की शिव-पार्वती यांना एक कन्या देखील होती. तिचं नाव होतं अशोक सुंदरी. तिचा जन्म कोणत्याही सामान्य रितीने झाला नाही. त्यामागील कथा एखाद्या पुराणातील सुंदर चमत्कारासारखी वाटते.

अशोक सुंदरीच्या जन्माची कथा
माता पार्वती हिमालयातील नंदनवनात फिरत होत्या. त्यावेळी, भगवान कार्तिकेय मोठा झाल्यामुळे स्वबळावर दूर गेलेला होता, आणि गणेश जन्मलेला नव्हता. त्यामुळे माता पार्वती थोड्याशा एकट्या वाटू लागल्या होत्या. या मानसिकतेत त्या एका विलक्षण झाडाकडे आकृष्ट झाल्या, ते झाड म्हणजे कल्पवृक्ष, जे सर्व इच्छा पूर्ण करतं असं मानलं जातं.
भगवान शिवने पार्वतीला कल्पवृक्षाची माहिती दिली आणि म्हटलं की हे झाड तिच्या कोणत्याही इच्छा पूर्ण करू शकतं. ते ऐकताच पार्वतीने आपल्या हृदयातली एक भावना या झाडासमोर व्यक्त केली “मला एक सुंदर कन्या हवी आहे, जी माझी सोबती होईल.” आणि त्या क्षणाला, कल्पवृक्षाच्या प्रभावाने एक तेजस्वी व मोहक कन्या प्रकट झाली. तिचं सौंदर्य आणि तिच्या डोळ्यांतील निरागसता पाहून पार्वतीने तिला अशोक सुंदरी असं नाव दिलं.
पद्मपुराणातील अशोक सुंदरीचे वर्णन
पद्मपुराणात या गोष्टीचा विस्ताराने उल्लेख आहे. अशोक सुंदरी ही केवळ सुंदर नव्हती, तर ती अत्यंत बुद्धिमान, शक्तिशाली आणि शौर्यवान देखील होती. तिचं भविष्यही असामान्य होतं. तिचं लग्न राजा नहुष याच्याशी झालं, जो पुढे स्वर्गाचा राजा झाला होता. अशोक सुंदरी आणि नहुष यांना ययाती नावाचा पुत्र झाला. ययातीपासून पुढे चंद्रवंश आणि यदुवंश निर्माण झाला, ज्यातूनच कौरव, पांडव आणि भगवान श्रीकृष्ण यांसारखे महत्त्वाचे पात्र जन्मले.