Ahilyanagar News : अहिल्यानगर- जिल्ह्यात अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या कार्यवाहीला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. शुक्रवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत अहिल्यानगर जिल्ह्यात सुमारे २३५० विद्यार्थ्यांचे अकरावीसाठी विविध कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश झाले आहेत. जिल्ह्यात ऑनलाईन प्रवेशसाठी नोंदणी झालेल्या ४५४ उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांची यादी जाहीर झाली आहे. जिल्ह्यात दहावी उत्तीर्ण झालेले ६१ हजार ४१२ विद्यार्थी असून यातील अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी ५२ हजार २३२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे.
१ ते ७ जुलै दरम्यान विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करावा लागणार
जिल्ह्यात विविध तुकड्यांची प्रवेश क्षमता ८० हजार आहे. नियमित फेरी एकमधील कॅप व कोटा अंतर्गत प्रवेश प्रक्रियेची कार्यवाही सुरू झाली. सोमवारी विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार प्रवेश यादी जाहीर झाली असून १ ते ७ जुलै दरम्यान विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. त्यानंतर ९ जुलै रोजी दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागा प्रदर्शित करण्यात येणार आहेत. जिल्ह्यात अकरावीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची माहिती जिल्ह्यातील प्राचार्य, प्रवेश प्रक्रिया विभाग प्रमुख व तंत्रस्नेही शिक्षक यांच्या व्हॉट्स अॅप ग्रुपच्या माध्यमातून सर्व शाळांत पाठवण्यात आली आहे.

मुळ कागदपत्रे सादर करून प्रवेश घ्यावा लागणार
प्रवेश फेरी यादी जाहीर झाल्यानंतर आता महाविद्यालयात प्रथम प्राधान्यक्रम मिळालेल्या विद्यार्थ्यांना आपली मूळ प्रमाणपत्रे व त्यांच्या छायांकित प्रती वेळापत्रकारप्रमाणे मुदतीत सादर करून प्रवेश घ्यावा लागणार आहे. पहिल्या पसंत क्रमाच्या उच्च माध्यमिक विद्यालयात मिळूनही प्रवेश घेतला नाही, तर अशा विद्यार्थ्यांची नावे पुढील सर्व नियमित फेऱ्यांसाठी प्रतिबंधित करण्यात येणार आहेत. मात्र अशा विद्यार्थ्यांना ऑनलाईन संमती नोंदवून विशेष फेऱ्यात सहभागी होता येईल. पहिल्या पसंतीक्रमाव्यतिरिक्त अन्य पसंतीक्रमांकाचे उच्च माध्यमिक विद्यालय मिळाल्यास व ते विद्यार्थ्यांना मान्य असल्यास असे विद्यार्थी निर्धारित कालावधीत सदर उच्च माध्यमिक विद्यालयात आपली मूळ प्रमाणपत्रे व त्याच्या छायांकित प्रती सादर करून व शुल्क भरून आपला प्रवेश निश्चित करू शकतात.
जिल्हा स्तरावर तक्रार निवारण व मागदर्शन केंद्र
जिल्ह्यातील प्रत्येक तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया तक्रार निवारण व मार्गदर्शन समितीची स्थापना करण्यात आली आहे. प्रत्येक तालुक्यातील सर्व सोयींनीयुक्त एक कनिष्ठ महाविद्यालयामध्ये अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया मदत व मार्गदर्शन केंद्र स्थापन केले आहेत. जिल्हा स्तरावर अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया तक्रार निवारण व मागदर्शन केंद्र सुरू आहेत.
प्रवेशसाठी काॅलेज न मिळाल्यास काळजी करू नका
अकरावीच्या प्रवेश फेरीमध्ये प्रवेशासाठी कोणतेही उच्च माध्यमिक विद्यालय मिळाले नसल्यास अशा विद्यार्थ्यांचा समावेश पुढील लगतच्या फेरीमध्ये करण्यात येणार आहे. दिलेल्या पसंतीक्रमातील उच्च माध्यमिक विद्यालयातील प्रवेशासाठी न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी नाऊमेद न होता, आपल्या पसंतीच्या उच्च माध्यमिक विद्यालयात कट ऑफ पुनश्च तपासून पसंतीक्रमाची पुनर्रचना करावी. पुढील फेरीसाठी अर्ज भाग २ भरावा, असे जिल्हा माध्यमिक शिक्षण विभागाने सांगितले.