Ahilyanagar News: श्रीगोंदा- शहरातील जिल्हा परिषदेच्या मुलींच्या शाळेत पोषण आहारातील तांदळाच्या साठ्यात असलेली तफावत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी उघडकीस आणत शाळेच्या भ्रष्टकारभाराचा भांडाफोड केला. शिक्षण विभागातील पोषण आहार अधिकाऱ्यांना सोबत घेऊन शाळेच्या पोषण आहाराची तपासणी केली असता, अनेक गंभीर बाबी समोर येत शाळेतील तांदळाचा रेकॉर्डवरील तपशील आणि उपलब्ध साठा यात तब्बल २ हजार ३८५ किलोची तफावत आढळून आली. या प्रकरणी पोषण आहार अधीक्षक सत्यजित मच्छिद्र यांच्याकडून शेरे बुकमध्ये नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणात दोषी असणाऱ्या मुख्याध्यापिका जगताप यांच्यावर प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे व उपाध्यक्ष नाना शिंदे यांनी केली आहे.
संभाजी ब्रिगेडकडून भांडाफोड
येथील पोषण आहारासंदर्भात अनियमितता असल्याबाबत शिक्षण विभागाला संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे, जिल्हा उपाध्यक्ष नाना शिंदे यांनी निवेदन दिले होते. त्यानुसार शिक्षण विभागातील पोषण आहार अधिकाऱ्यांना सोबत घेऊन शाळेच्या पोषण आहाराची तपासणी केली. शाळेची जवळपास ५०० विद्यार्थी संख्या असून, त्यासाठी रोज किमान ५० किलो तांदूळ शिजवणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र फक्त १४ किलो तांदूळ दररोज शिजवत असल्याचे आढळून आले.

२ टन तांदळाचा घोळ
तांदूळ स्टॉक रजिस्टर तपासले असता या तपासणीमध्ये ३० जूनपर्यंत ४ हजार ३८५ किलो तांदूळ शिल्लक असल्याची नोंद होती. परंतु प्रत्यक्षात मात्र फक्त २ हजार किलो तांदूळ आढळून आला. स्टॉक रजिस्टरनुसार जवळपास सव्वादोन टनाहून अधिक तांदूळ कमी असल्याबाबत मुख्याध्यापकांना विचारणा केली असता, त्यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. उपलब्ध तांदूळ पहाणीमध्ये तांदळात मोठ्या प्रमाणात जाळी तसेच सोनकिडे आढळून आले.
कठोर कारवाईची मागणी
स्वयंपाकासाठी शाळेत ऑन रेकॉर्ड पाच कामगार दाखवत प्रत्यक्षात दोनच महिला काम करताना आढळून आल्या. शासन परिपत्रकानुसार मुलांना जेवणाचे ताट देणे गरजेचे असताना एकही ताट आढळून आले नाही. लहान मुलांसाठी शासन पोषण आहार पुरवते, पण समाजतील भ्रष्टाचाराची कीड हे पोषण आहार खात असून, याबाबत पाठपुरावा करून मुख्याध्यापकांसह दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी आग्रही राहणार आहे. -अरविंद कापसे, जिल्हाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड
खुलासा मागवणार
पालकांच्या तक्रारीवरून शाळेतील पोषण आहाराची तपासणी केली. जवळपास सव्वादोन टन तांदूळ कमी आढळून आला आहे. मुख्याध्यापकांकडून सव्वादोन टन तांदूळ कमी असल्याबाबत खुलासा मागविणार असून, त्यानंतर पुढील कारवाई करणार आहे. – सत्यजित मच्छिद्र, पोषण आहार अधीक्षक