30 नॉट्स वेग, 250 नौदल कर्मचारी आणि…; भारतीय नौदलाच्या ताफ्यात आली सर्वात शक्तिशाली ‘INS Tamal’ युद्धनौका!

Published on -

भारतीय नौदलाची ताकद आता एका नव्या टप्प्यावर पोहोचली आहे. आज 1 जुलै 2025 रोजी भारताच्या सागरी सुरक्षेत युद्धनौका ‘तमाल’ सामील झाली आहे. शत्रूच्या छावण्यांसाठी ही एक चालतं-फिरतं संकट ठरणार आहे. ब्रह्मोस सारख्या सुपरसॉनिक क्षेपणास्त्रांनी सज्ज, अत्याधुनिक तंत्रज्ञानाने भरलेली आणि 250 हून अधिक प्रशिक्षित जवानांनी सुसज्ज अशी ही नौका केवळ युद्धासाठी नव्हे, तर भारताच्या सागरी स्वायत्ततेसाठीही एक निर्णायक पाऊल आहे.

‘INS Tamal’ युद्धनौका

‘तमाल’ म्हणजे केवळ एक युद्धनौका नाही, तर ती भारताच्या ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांचा एक भक्कम नमुना आहे. या नौकेत तब्बल 26 स्वदेशी उपकरणे बसवण्यात आली आहेत, ज्यात ब्रह्मोस क्रूझ क्षेपणास्त्रही आहे, जे जमिनीवर तसेच समुद्रावर लक्ष्य भेदण्यात अचूक ठरते. उभ्या प्रक्षेपण प्रणालीसह, जलद गतीची पाणबुडीविरोधी रॉकेट्स, टॉर्पेडो, आणि 100 मिमीची तोफ यामुळे ही युद्धनौका एखाद्या चालत्या किल्ल्यासारखी भासते.

तमाल 30 नॉट्सपेक्षा अधिक वेगाने समुद्रात धावू शकते, ही क्षमता तिला दीर्घ समुद्रविहारात वापरण्यास अधिक उपयुक्त बनवते. आधुनिक नेटवर्क वॉरफेअर प्रणाली आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सुविधांमुळे ती शत्रूच्या हल्ल्यांना वेळेआधी ओळखून प्रत्युत्तर देऊ शकते. यामुळे तिला फक्त लढाईत नव्हे, तर धोरणात्मक सागरी मोहिमांमध्येही मोलाचं स्थान प्राप्त होतं.

ही नौका रशियाच्या कॅलिनिनग्राड येथील ‘यंतर शिपयार्ड’मध्ये बांधण्यात आली असून, ती ‘क्रिव्हक क्लास फ्रिगेट’ मालिकेतील आठवी व ‘तुशील क्लास’मधील दुसरी आहे. विशेष म्हणजे, हीच भारताच्या परदेशातून मिळवण्यात आलेल्या शेवटच्या युद्धनौकांपैकी एक ठरणार आहे. भविष्यातील बाकीच्या फ्रिगेट्स गोवा शिपयार्ड लिमिटेडमध्ये रशियन डिझाईन आणि सहकार्याने बांधल्या जातील.

‘तमाल’ नावामागील अर्थ

‘तमाल’ हे नाव देखील तितकंच रोमहर्षक आहे. पौराणिक कथांनुसार, देवाधिदेव इंद्राने याच नावाची तलवार युद्धात वापरली होती. आज हे नाव भारताच्या नौदलाची तलवार बनून परकीय सागरी सीमांवर जागृत उभी राहणार आहे. ती एक आधुनिक स्टेल्थ मल्टी-रोल फ्रिगेट आहे जी तांत्रिक ताकद, पौराणिक प्रेरणा आणि देशभक्तीचा त्रिवेणी संगम दर्शवते.

या नौकेतील जवानांना रशियातील कडाक्याच्या थंडीमध्ये, सेंट पीटर्सबर्ग आणि कॅलिनिनग्राड येथे अत्यंत कठोर प्रशिक्षण देण्यात आले आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये या नौकेने अनेक समुद्री चाचण्या उत्तम प्रकारे पूर्ण केल्या आहेत, जी तिच्या कार्यक्षमतेची पुरावे आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!