पुरीच्या श्रीजगन्नाथ मंदिरातील रथयात्रा ही फक्त एक धार्मिक सोहळा नाही, तर ती श्रद्धा, भक्ती आणि परंपरेचा संगम आहे. या दिवशी लाखो भाविक आपली सेवा अर्पण करतात आणि प्रभूच्या रथात सहभागी होतात. अशा या रथयात्रेदरम्यान एक अतिशय विशेष आणि अनोखी परंपरा पार पडते, ती म्हणजे भगवान जगन्नाथांना कडुलिंब अर्पण केले जाते. भगवंताला इतक्या मधुर 56 भोगांमध्ये हे कडू औषधच का अर्पण करतात, हा प्रश्न पडणे साहजिक आहे. पण, यामागची कथाही खूप भावनिक आणि अद्वितीय आहे.

जगन्नाथ मंदिरातील अद्भुत परंपरा
खूप वर्षांपूर्वी, पुरीच्या मंदिराजवळ एक वृद्ध महिला राहत होती. ती आपल्या देवाला केवळ ईश्वर म्हणून नव्हे, तर स्वतःचा मुलगा मानत असे. रोजच्या रोज मंदिरात जाऊन सेवा करणे, त्याच्याशी संवाद साधणे, ही तिची आयुष्यभराची साधना होती. एके दिवशी तिला वाटले, इतका साखरेचा, तुपाचा आणि गोड पदार्थांचा नैवेद्य रोज खाल्ल्यावर तिच्या देवाच्या पोटाला त्रास होत असेल का? आईसारख्या मायेने तिने विचार केला आणि उपाय शोधला.
तिने कडुलिंबाची पानं सुकवली, त्याची पावडर केली आणि ती औषध म्हणून मंदिरात अर्पण करायला गेली. पण गेटवर उभ्या असलेल्या सैनिकांनी तिला थांबवलं. “हे काय आहे? देवाला कडू औषध कशाला?” असं म्हणत त्यांनी तिला परवानगी नाकारली. त्या क्षणी ती महिला मनात खूप दुखावली गेली. कारण तिच्या नजरेत ती केवळ औषधी नव्हती, तर मुलाच्या काळजीतून दिलेली एक प्रेमाची भेट होती.
अन् सुरू झाला कडुलिंब अर्पणाचा रिवाज
त्या रात्री भगवान जगन्नाथ स्वतः पुरीच्या राजाच्या स्वप्नात आले. त्यांच्या चेहऱ्यावर राग नव्हता, पण व्यथित भक्ताची तक्रार होती. त्यांनी संपूर्ण प्रसंग सांगितला आणि स्पष्टपणे सांगितले की, त्या वृद्ध भक्तीचा आदर व्हायला हवा. राजाने दुसऱ्या दिवशी सकाळी उठताच वृद्ध महिलेच्या घरी धाव घेतली. तिची क्षमा मागितली आणि विनंती केली की ती पुन्हा कडुलिंबाची पावडर तयार करून देवाला अर्पण करावी.
त्या माउलीने प्रेमाने पुन्हा चूर्ण तयार केलं, आणि राजाच्या हस्ते ते देवाला अर्पण करण्यात आलं. भगवान जगन्नाथानेही ते प्रसाद म्हणून प्रेमाने स्वीकारले. हे फक्त एक औषध नव्हते, तर भक्ताच्या भावनेची परिसीमा होती. तेव्हापासून आजपर्यंत ही परंपरा सुरू आहे. जेव्हा रथयात्रेत 56 नैवेद्य अर्पण केले जातात, त्यानंतर कडुलिंबाची पावडरही देवाला अर्पण केली जाते.