अहिल्यानगर महापालिकेने केली २७ कोटींची विक्रमी कर वसली, कर न भरणाऱ्यावर लवकरच कारवाई होणार

अहिल्यानगर महानगरपालिकेने एप्रिल ते जून सवलत कालावधीत विक्रमी २७ कोटींची कर वसुली केली. गतवर्षीपेक्षा तीन कोटी अधिक महसूल मिळाला. १ जुलैपासून थकीत मालमत्तांवर दरमहा २ टक्के शास्ती आकारली जात आहे.

Published on -

Ahilyanagar News: अहिल्यानगर- महानगरपालिकेने एप्रिल ते जून या सर्वसाधारण करावरील सवलत कालावधीत या वर्षी विक्रमी २७ कोटींची वसुली केली आहे. ३९५१८ मालमत्ताधारकांनी या सवलतीचा लाभ घेऊन कराचा भरणा केला आहे. नियमित कर भरून शहराच्या विकासात हातभार लावणाऱ्या करदात्यांचे महानगरपालिकेकडून आभार व्यक्त करण्यात आले आहेत. तसेच, १ जुलैपासून मालमत्ता करावर २ टक्के दंड म्हणजेच शास्ती आकारणी सुरू करण्यात आल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली.

करावर १० टक्के सवलत

महानगरपालिकेने एप्रिल व मे महिन्यात संकलित करावर १० टक्के सवलत दिली होती. २३,४७८ नागरिकांनी व मालमत्ताधारकांनी या योजनेचा लाभ घेऊन कर भरला. त्यानंतर जून महिन्यात १६,०४० मालमत्ताधारकांनी ८ टक्के सवलतीचा लाभ घेऊन कर जमा केला. या सर्व मालमत्ताधारकांनी जमा केलेल्या २८.१३ कोटींमध्ये ८६.३२ लाखांची सवलत देण्यात आली असून, २७.२७ कोटी रुपयांचा प्रत्यक्ष कर महानगरपालिकेत जमा झाला आहे.

कर वसुलीचा नवा विक्रम

महानगरपालिकेने कराच्या वसुलीसाठी यंदा जनजागृतीवर अधिक भर दिला होता. त्यामुळे मागील वर्षीपेक्षा तीन कोटींनी अधिक कर जमा झाला आहे. यापूर्वी एप्रिल ते जून महिन्यात २२ कोटी, २४ कोटी रुपये कर वसुलीची नोंद झाली होती. यावर्षी वसुलीचा नवा विक्रम महानगरपालिकेने नोंदवला आहे. ज्या मालमत्ताधारकांनी कराचा भरणा केलेला नाही त्यांच्यावर दरमहा २ टक्के शास्ती आकारणी सुरू करण्यात आली आहे.

कर न भरल्यास कारवाई

गतवर्षी पेक्षा जास्त करदात्यांनी सवलतीचा फायदा घेतला. नियमित कर भरणाऱ्या करदात्यांचे मनपा प्रशासन आभारी आहे. आता अधिकचा दंड टाळण्यासाठी मालमत्ताधारकांनी तत्काळ कराचा भरणा करावा. लवकरच मोठ्या थकबाकीदारांवर महानगरपालिकेकडून कारवाई सुरू करण्यात येणार आहे.– यशवंत डांगे, आयुक्त तथा प्रशासक

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!