Ahilyanagar News: अहिल्यानगर- नगर तालुक्यातील रुईछत्तीसी गावच्या शिवारात शेतातील कडुनिंबाच्या झाडाला गळफास घेऊन एका वारकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना ३० जून रोजी सकाळी उघडकीस आली. सुखदेव लक्ष्मण रावे (वय ६२, रा. मिसळवाडी, बुलढाणा) असे आत्महत्या केलेल्या वारकऱ्याचे नाव आहे.
पांडुरंगाचं दर्शन घेतलं
मयत सुखदेव रावे यांचा केस कर्तनाचा व्यवसाय असून ते दरवर्षी पंढरपूरची वारी करत होते. या वर्षी ते गावाहून आळंदी येथे गेले, तेथून दिंडीत सहभागी झाले, दिंडीचा मुक्काम नातेपुते येथे असताना त्यांनी एसटी बसने पंढरपूर गाठले. तेथे विठ्ठलाचे दर्शन घेवून ते पुन्हा एसटी बसने गावाकडे जात होते.

माघारी येतांना गळफास घेतला
मात्र २९ जून रोजी सायंकाळी ते रुईछत्तीशी गावाजवळ उतरले होते. त्यानंतर ३० जून रोजी सकाळी धर्मा अण्णा गोरे यांच्या शेतात कडुनिंबाच्या झाडाला त्यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. नगर तालुका पोलिसांनी रुग्णवाहिका बोलावून रावे यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
उपचारापूर्वीच मृत्यू
मात्र डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मयत झाल्याचे घोषित केले. मयत रावे यांच्या पश्चात पत्नी, तीन भाऊ, एक बहीण, एक मुलगा, एक मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.